चूक कबूल करा, तुमची थोरवी वाढेल
By admin | Published: December 25, 2016 01:09 AM2016-12-25T01:09:31+5:302016-12-25T01:09:31+5:30
देशात आणीबाणी लागू करणे ही आपल्याकडून झालेली चूक होती हे इंदिरा गांधी यांनी मोठ्या मनाने कबुल केले आणि त्यामुळे त्यांची थोरवी आणखी वाढली. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा
चेन्नई : देशात आणीबाणी लागू करणे ही आपल्याकडून झालेली चूक होती हे इंदिरा गांधी यांनी मोठ्या मनाने कबुल केले आणि त्यामुळे त्यांची थोरवी आणखी वाढली. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा निर्णय सदोष असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य करावे व आणखी मोठेपणा मिळवावा, अशी सूचना माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली.
येथील राज्य काँग्रेस मुख्यालयासोमोरील पटांगणात एका जाहीर सभेत बोलताना चिदम्बरम म्हणाले की, आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली देण्यात कसलाही कमीपणा नाही. चुकीची कबुली देण्यात काहीच चूक नाही. सन १९७५ मध्ये देशात अणीबाणी लागू करणे ही आपल्याकडून झालेली चूक होती व त्यामुळे देशवासियांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या याची कबुली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिली होती. एवढेच नव्हे तर अशी चूक पुन्हा कधीही न करण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. यामुळे इंदिराजींची थोरवी कमी न होता उलट ती वाढली. म्हणूनच निधनानंतर ३२ वर्षांनीही देशवासियांच्या हृदयात इंदिराजींची जागा टिकून आहे.
इंदिराजींचे अनुकरण करून नरेंद्र मोदी यांनीही नोटाबंदीच्या संदर्भात आपली चूक कबुल करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र मोदी तसे न करता आपला चुकीचा निर्णय हट्टाने रेटून नेत आहेत. सभांमध्ये आवेशपूर्ण हावभाव करत ते त्याचे समर्थन करीत आहेत. परंतु त्यांच्या या भूलथापा देशवासियांना पटणाऱ्या नाहीत, असेही ते म्हणाले.
मला चुकीचा सल्ला दिला गेला व त्याआधारे मी हा निर्णय घेतला. नोटा छापण्याच्या नेमक्या क्षमतेची मला माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पर्यायी चलनाच्या अभावी लोकांना कित्येक महिने त्रास सोसावा लागेल याची मला कल्पना आली नाही, असे मोदींनी स्पष्टपणे सांगितले असते तर लोकांनी ते मान्य केले असते व त्यांचा मोठेपणा आणखी
वाढला असता, असेही चिदम्बरम म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मध्यमवर्गीय
भरडून निघाला
नोटाबंदीचा चुकीचा निर्णय आणि त्याची अयोग्य अंमलबजावणी यामुळे ४५ कोटी नागरिकांवर स्वत:च्याच पैशांसाठी भीक मागण्याची वेळ आली आणि मध्यमवर्गीय ४५ दिवस भरडले, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापल्या वस्त्यांमध्ये सभा घेऊन नोटाबंदीने काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मूलन होईल या भाजपाच्या फसव्या प्रचाराचा बुरखा लोकांना समजेल अश भाषेत दूर करावा, असे त्यांनी आवाहन केले.
नोटा टंचाईमागील खरे कारण काय?
चलनी नोटा छापणारे छापखाने पुरेशा नोटा छापण्यात अपयशी ठरत असल्यामुळे देशात नोटांची टंचाई निर्माण झाली आहे, असे कोणाला वाटत असेल, तर ते चूक आहे. नोटांच्या टंचाईमागे अनेक कारणे आहेत. या प्रकरणाशी संबंधित प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
- १0 डिसेंबर ते १९ डिसेंबर या काळात रिझर्व्ह बँकेने केवळ २२0 कोटी नव्या नोटा जनतेत वाटप करण्यासाठी वितरित केल्या.
- वितरित झालेल्या नोटांपैकी ९0 टक्के नोटा २ हजारांच्या आणि उरलेल्या नोटा ५00 रुपयांच्या आहेत, असे गृहीत धरल्यास १९ डिसेंबरपर्यंत ४.0७ लाख कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेने वितरित केल्या आहेत.
- रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार याचिकेवर दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरपूर्वी रिझर्व्ह बँकेने २ हजारांच्या
४.९४ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा छापल्या होत्या.
- रिझर्व्ह बँकेने १९ डिसेंबरपर्यंत वितरित केलेल्या नोटांपेक्षा छापलेल्या नोटांची किंमत जवळपास १ लाख कोटींपेक्षा जास्त आहे.
- नोटाबंदीनंतरही सरकारकडून नोटा छपाईचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होते. छापखान्यांची क्षमता लक्षात घेता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या किमान २ लाख कोटी मूल्यांच्या नोटा छापण्यात आल्या असाव्यात.
- नोटाबंदीच्या आधी छापलेल्या नोटा यात मिळविल्यास उपलब्ध नोटांचा आकडा ७ कोटी रुपयांपेक्षाही जास्त होतो. मग १९ डिसेंबरपर्यंत केवळ ४.0७ लाख कोटी रुपयांच्या नोटाच का चलनात आणण्यात आल्या. याची विचारणा
रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयाकडे करण्यात आली. तथापि, त्यांच्याकडून गेल्या ४८ तासांत कोणतेही उत्तर मिळाले नाही.
- रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,
नव्या नोटा वितरित करण्यासाठी एटीएम यंत्रांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
- पाचशेच्या नोटांच्या छपाईचे वेळी काही लॉटमध्ये चुका आढळून आल्या होत्या. त्यामुळे छपाई अन्यत्र हलवावी लागली.
- छपाई हलविण्यात आल्यामुळे दोन छापखान्यांतील छपाईची गती जवळपास ३ आठवडे मंदावली होती.
- अचानक मोठ्या प्रमाणात नव्या नोटा वितरणासाठी दिल्यास बँकांत तुफान गर्दी होण्याची भीती सरकारने व्यक्त
केली होती.