जीएसटीवर दृढ विश्वास!
By admin | Published: November 26, 2015 12:03 AM2015-11-26T00:03:05+5:302015-11-26T00:03:05+5:30
जीएसटीवर काँग्रेसचा दृढ विश्वास आहे. परंतु सरकारने दर मर्यादेसह काही मुद्यांवर विरोधकांसोबत चर्चा केली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेच्या
बंगळुरू : जीएसटीवर काँग्रेसचा दृढ विश्वास आहे. परंतु सरकारने दर मर्यादेसह काही मुद्यांवर विरोधकांसोबत चर्चा केली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केले. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला करतानाच वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयकावरील आपल्या पक्षाची भूमिकाही मांडली. मोदी सरकार ‘सुट बुट की सरकार’पेक्षाही अधिक वाईट आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी बुधवारी बेंगळुरू येथील प्रतिष्ठित माऊंट कार्मेल महिला महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरणावर विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
जीएसटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, ‘जीएसटीवर आमचा दृढ विश्वास आहे. जीएसटी आणि अन्य विधेयके फार महत्त्वाची आहेत. परंतु सरकारची भूमिका विरोधकांसोबत जुळवून घेण्याची असली पाहिजे.’
यानंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलले. काँग्रेस वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार. याशिवाय जीएसटी आणि विविध मुद्यांवरील पंतप्रधानांचे मौन हेही मुद्दे आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)