मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; २० महिला जखमी, जवानांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 07:33 AM2023-08-04T07:33:12+5:302023-08-04T07:34:06+5:30
जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या.
इम्फाळ : मणिपूरच्या विष्णूूपूर जिल्ह्यात कंगवई आणि फौगकचाओ भागांमध्ये गुरुवारी संतप्त जमाव व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यावेळी लोकांनी लष्कर तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व घटनांत २० महिला जखमी झाल्या.
सुरक्षा दलांच्या जवानांची कोंडी करण्यासाठी बिष्णूपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमाव रस्त्यावर उतरला होता. लष्कर व आरएएफने जागोजागी उभारलेली बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न जमावाने केला.
दफनभूमीच्या ठिकाणी ‘जैसे थे’ स्थिती ठेवा...
वांशिक संघर्षामध्ये ठार झालेल्या ३५ जणांचा चुराचंदपूर जिल्ह्यातील हाओलाई खोपी गावात गुरुवारी सामुदायिक दफनविधी करण्याचे आयटीएलएफ या संघटनेने ठरविले होते. मात्र, दफनभूमीच्या जागेबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिथे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश मणिपूरचे हंगामी मुख्य न्यायाधीश एम. व्ही. मुरलीधरन यांनी दिले.