वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे निधन
By admin | Published: May 23, 2017 08:34 PM2017-05-23T20:34:15+5:302017-05-23T20:42:39+5:30
वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे वयाच्या 66व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचे वयाच्या 66व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात चंद्रास्वामी मीडियाच्या केंद्रस्थानी होते. दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे गुरू म्हणून चंद्रास्वामी परिचित होते. नरसिंहराव पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर चंद्रास्वामींना प्रसिद्धी मिळाली.
1948मध्ये जन्माला आलेल्या चंद्रास्वामींचे कागदोपत्री नाव नेमिचंद होते. राजकीय नेत्यांपासून ते सिनेसृष्टीसह गुंडपुंड मंडळींचे चंद्रास्वामी हे गुरू होते. नरसिंहरावांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात चंद्रास्वामी यांनी दिल्लीत आश्रम बांधले होते. त्यावेळी आश्रमासाठी इंदिरा गांधींनी जमीन दिल्याची चर्चा होती. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर, हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, बहरीनचे राजेसुद्धा चंद्रास्वामी यांच्या भक्त होत्या. चंद्रास्वामी हे वादग्रस्त तांत्रिक म्हणून लोकांना परिचित होते. लंडनमध्ये एका व्यावसायिकाला एक लाख डॉलरचा चुना लावल्याप्रकरणी त्यांनी जेलचीही हवा खाल्ली होती.
विशेष म्हणजे राजीव गांधींच्या हत्यारांना चंद्रास्वामींनी पैसे पुरवण्याचाही आरोप करण्यात आला होता. 2009मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या परदेश दौ-यावरील निर्बंध हटवले होते. चंद्रास्वामी यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायू या आजारानं पछाडलं होतं. या आजारामुळे अवयवदेखील निकामी झाले होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचं अपोलो रुग्णालयाने सांगितले आहे.