महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
By Admin | Published: September 25, 2014 04:12 AM2014-09-25T04:12:26+5:302014-09-25T04:12:26+5:30
शहरातील दोन्ही मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे
नवी मुंबई : शहरातील दोन्ही मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार कोण असणार याविषयी संभ्रम कायम आहे. बेलापूर मतदार संघ शिवसेनेला जाणार की भाजपाला याविषयी तिढाही अद्याप सुटलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ऐरोली मतदार संघातून राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने विद्यमान आमदार संदीप नाईक व बेलापूरमधून ठाणे जिल्'ाचे पालकमंत्री गणेश नाईक निवडणूक लढविणार आहेत. या दोघांनीही आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन, उद्घाटन, होर्डिंग, कार्यअहवालाच्या माध्यमातून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात निवडणूक नक्की कोण लढणार हेच अद्याप निश्चित झालेले नाही. ऐरोली मतदार संघामध्ये शिवसेनेच्या वतीने विजय चौगुले व वैभव नाईक यांची नावे निश्चित आहेत. चौगुले यांनी उमेदवारी निश्चित समजून कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने बांधणी सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार सुरू केला आहे. परंतु पक्षाने अद्याप अधिकृतपणे कोणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही.
बेलापूर मतदार संघ भारतीय जनता पक्षाच्या कोट्यात आहे. भाजपाच्यावतीने माजी आमदार मंदा म्हात्रे इच्छुक आहेत. शिवसेनेनेही या मतदार संघावर दावा केला आहे. महापालिकेचे माजी आयुक्त व सेनेचे उपनेते विजय नाहटा, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे येथे प्रबळ दावेदार आहेत.