बंगळुरूत महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:58 AM2020-01-10T04:58:40+5:302020-01-10T04:58:52+5:30
सीएएला पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथील कोरामंगलाजवळील ज्योती निवास महाविद्यालयात गोंधळ घातला.
बंगळुरू : नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याला (सीएए) पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथील कोरामंगलाजवळील ज्योती निवास महाविद्यालयात गोंधळ घातला. महाविद्यालय परिसराबाहेर कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तानात परत जा’ अशा घोषणा दिल्या, तर आमच्या संस्थेच्या भिंतीवर सीएएला पाठिंबा असलेले भित्तीपत्रक चिकटवण्यास विद्यार्थिनींनी विरोध केला.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत होता. भाजपचे स्थानिक नेते एम.एम. गोविंदराज यांचे समर्थक व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गटाने ‘भारताचा सीएएला पाठिंबा’ असा मजकूर असलेले भित्तीपत्रक महाविद्यालयाच्या भिंतीवर चिकटवले होते. असे भित्तीपत्रक आम्ही महाविद्यालयाच्या भिंतीवर लावू देणार नाही, असे म्हणून या भित्तीपत्रकाला विद्यार्थिनींनी विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा त्यांना आरडाओरड करून गप्प बसवले. ‘तुम्हाला नागरिकत्वाबद्दल काळजी नाही, तर तुम्हाला फक्त तुमचीच काळजी आहे.
आधी तुम्ही भारताची काळजी केली पाहिजे,’ असे भाजपचा कार्यकर्ता मुलींवर ओरडताना त्या व्हिडिओमध्ये ऐकू आले. सीएएला विरोध करण्यासाठी तुमच्याकडे कोणतीही ठोस कारणे व सीएएवर वादविवाद किंवा युक्तिवाद करण्याची तुमची इच्छा आहे का, असे कार्यकर्त्यांनी विचारले.
बीटीएम लेआऊटचे काँग्रेसचे आमदार रामलिंग रेड्डी यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी गुरुवारी महाविद्यालयाला भेट दिली व नंतर ते त्याच्या व्यवस्थापनाशी बोललेदेखील. नंतर वार्ताहरांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, ‘महाविद्यालयाचा परिसर कोणत्याही राजकीय उपक्रमांसाठी वापरला जाऊ नये.’
>तुम्हा मुलींना सीएए का खटकतो आहे?
कार्यकर्त्यांनी या मुलींना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही या महाविद्यालयात फक्त विद्यार्थिनी आहात, त्याच्या मालक नाही. तुम्हा मुलींना सीएए का खटकतो आहे? तुम्ही या महाविद्यालयाच्या मालक आहात का? असा प्रश्न त्यांनी विचारला. यातून जोरदार वादावादी झाली.
नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्हाला सीएए हवा आहे’ आणि ‘पाकिस्तानात परत जा’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्याचे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिसते.