‘एपी’मुळे गोंधळ; विद्यार्थी गेला अरुणाचलऐवजी आंध्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:40 AM2017-08-29T04:40:45+5:302017-08-29T04:41:01+5:30
आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.
नवी दिल्ली : आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.
दानियाल खान या विद्यार्थ्याला नॅशनल इन्स्टिस्ट्यूट आॅफ इंडियात (एनआयटी) प्रवेशाची संधी मिळाल्याचे पत्र मिळाल्यावर तो आणि त्याचे कुटुंबीय हरखून गेले. त्याचे वडील आणि त्याच्या काही मित्रांनी एपीमधील एनआयटीच्या परिसरात रस्त्याने प्रवास करून जायचे ठरवले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यांचा प्रवास करून आंध्र प्रदेशात पोहोचण्यास १६ तास लागले. पण तेथे पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. दानियालला ज्या एनआयटीने प्रवेश मंजूर केला होता ती एनआयटी आंध्र प्रदेशातील नव्हतीच. प्रवेशपत्रावर जे ‘एपी’ असा जो उल्लेख होता, तो आंध्र प्रदेशशी नव्हे, तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित होता. दानियालने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तो म्हणतो की, एवढा प्रवास करून गेल्यानंतर समन्वयकांनी तुमचा गैरसमज झाल्याचे सांगितले. मला आलेल्या पत्रावर मला ‘एनआयटी-एपी’मध्ये प्रवेश मंजूर झाल्याचे म्हटले होते. आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशचा उल्लेख ‘एपी’ असा केला जातो. मी आंध्र प्रदेशचा ९३० किलोमीटरचा प्रवास केला. आमच्यापैकी कोणालाही एपी म्हणजे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश असेल, असे वाटलेही नव्हते.
दानियालने गुगलवर एनआयटी-एपी असे सर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती एनआयटी आंध्र प्रदेशची होती. त्याला आलेल्या पत्रातही अरुणाचलचा उल्लेख नव्हता. विद्यार्थी मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेश ते अरुणाचल हे अंतर २,५७५ किलोमीटर असून, तो सलग प्रवास ५१ तासांचा आहे.