संसदेत गोंधळ : १४ खासदार निलंबित, सुरक्षेत हयगय; ८ पोलिसांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:44 AM2023-12-15T04:44:28+5:302023-12-15T04:44:48+5:30

सुरक्षाव्यवस्थेवरून विरोधकांचा हल्लाबोल; हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत कारवाई

Confusion in Parliament 14 MPs suspended, security harmed Action against 8 Police | संसदेत गोंधळ : १४ खासदार निलंबित, सुरक्षेत हयगय; ८ पोलिसांवर कारवाई

संसदेत गोंधळ : १४ खासदार निलंबित, सुरक्षेत हयगय; ८ पोलिसांवर कारवाई

आदेश रावल

नवी दिल्ली :संसदेची सुरक्षा भेदत बुधवारी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. या प्रकरणी लोकसभेतील १३ खासदारांसह राज्यसभेतील तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीपर्यंत निलंबित करण्यात आले.

दरम्यान, संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर घुसखोरी करणाऱ्या तरुणांवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) कायद्यांतर्गत ठपका ठेवण्यात आला. त्यापैकी चार जणांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोन तरुणांनी घुसखोरी केल्याबद्दल विरोधकांनी दोन्ही सभागृहांत आवाज उठविला. सुरक्षेत एवढा मोठा घोळ झाला आहे, यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत उत्तर द्यावे, अशी मागणी लावून धरत दोन्ही सदनांत गदारोळ केला. कामकाजात अडथळा आणल्याबद्दल संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील १४ खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला, तो आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने त्यांना अधिवेशनाच्या उर्वरित काळापुरते निलंबित करण्यात आले.

फलक सभागृहात आणले म्हणून केले निलंबित

प्रल्हाद जोशी म्हणाले की, जेव्हा सभागृहाचे कामकाज नवीन संसदेच्या इमारतीत स्थलांतरित झाले तेव्हा सभापतींनी कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत प्रस्ताव दिला होता की, सदस्यांनी सभागृहात फलक न दाखवण्याचा नव्याने संकल्प करून काम करावे. हा प्रस्ताव सर्वांनुमते मंजूर झाला. त्याला कोणीही विरोध केला नाही. १३ खासदारांनी बीएसी बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन केले आणि फलक सभागृहात आणले, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

चुकून नाव आल्याने पार्थिबन यांचे निलंबन मागे

द्रमुक खासदार एस. आर. पार्थिबन यांचे नावही निलंबित खासदारांच्या यादीत होते; परंतु ते सभागृहात  नसतानाही चुकून त्यांचे नाव यादीत आल्याची बाब लक्षात आल्यावर त्यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. सदस्याची ओळख पटवण्यात चूक झाल्यामुळे पार्थिबन यांचे नाव मागे घेतल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.

सुरक्षा करणारे होते डेप्युटेशनवर...

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली. निलंबित पोलिस कर्मचारी संसदेच्या सुरक्षेसाठी प्रतिनियुक्तीवर होते आणि अभ्यागतांना आणि माध्यमांच्या तपासणीचे काम त्यांच्याकडे होते.

निलंबित पोलिसांमध्ये रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र यांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. संसद परिसर तसेच इमारतीत प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिस तैनात आहेत. तेथील सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) जबाबदार आहे.

चौघांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत आरोप

संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) व्यतिरिक्त भादंविच्या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी गुरुग्राममध्ये विशाल शर्मा ऊर्फ विकी याच्या घरी थांबले होते. सागर शर्मा (वय २६), मनोरंजन डी. (३४), अमोल शिंदे (२५) आणि नीलम देवी (३७) या चारही अटक केलेल्यांची बुधवारी मध्यरात्री वैद्यकीय तपासणी झाली.

Web Title: Confusion in Parliament 14 MPs suspended, security harmed Action against 8 Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parliamentसंसद