भाजप सदस्याच्या विधानावरून गोंधळ
By admin | Published: December 10, 2015 11:15 PM2015-12-10T23:15:41+5:302015-12-10T23:15:41+5:30
दुष्काळावरील चर्चेत भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात, लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
दुष्काळावरील चर्चेत भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात, लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. ही विधाने कामकाजातून काढून टाकावीत व वीरेंद्रसिंग यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगावे, अशी मागणी काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी केली. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वादग्रस्त विधाने काढण्याचे आश्वासन दिले; मात्र वीरेंद्र्रसिंग यांनी माफी न मागितल्याने सरकारविरुद्ध घोषणा देत काँग्रेस व तृणमूल सदस्यांनी सभात्याग केला, तर राज्यसभेत सरकारच्या सूडबुद्धीच्या विरोधात सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ झाल्यामुळे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब झाले.
अध्यक्षांकडे सदरप्रकरणी न्याय मागण्याच्या घोषणा देत काँग्रेस सदस्यांनी सलग दोन तास सभागृहात गोंधळ घातला. तेव्हा अध्यक्षा म्हणाल्या, कोणालाही माफी मागण्याची बळजबरी मी करू शकत नाही. यावेळी सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत काँग्रेसने लोकसभेत सभात्याग केला.
तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय व सौगत रॉय यांनीही हेच प्रकरण अधोरेखित करीत अध्यक्षांकडून विरोधकांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि काँग्रेसपाठोपाठ सभात्याग केला. तृणमूल खासदारांचे काँग्रेसबद्दल अचानक वाढलेले प्रेम पाहून सभागृहात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
>
काय म्हणाले वीरेंद्रसिंग
लोकसभेत दुष्काळावरील चर्चेत बोलताना भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग म्हणाले, ‘काँग्रेस शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कळवळा तर व्यक्त करते; मात्र या पक्षाचे नेते राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यासारख्या नेत्यांना ज्वारी, बाजरी आणि गव्हात फरक काय ते देखील समजत नाही.
एका गरीब घरातली व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली, याची काँग्रेसजनांना खंत आहे. त्यांचा असा समज आहे की, हे पद फक्त गांधी-नेहरू घराण्यासाठीच राखीव आहे.’
वीरेंद्र्रसिंगांच्या उपरोक्त विधानांवर काँग्रेस सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. लोकसभाध्यक्षांनीही वीरेंद्र्रसिंगांना ताकीद देत त्यांची विधाने कामकाजातून काढून टाकणार असल्याचे जाहीर केले.
सदस्याने दिलगिरी व्यक्त करावी, असेही अध्यक्षांनी सुचवले; मात्र वीरेंद्र्रसिंगांकडून प्रतिसाद मिळाला नाही. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडूंनी काँग्रेस सदस्यांच्या वर्तनाचे दाखले देत वीरेंद्र्रसिंगांचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.