हिंसाचारावरून गोंधळ; सभागृहांचे कामकाज तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 06:24 AM2020-03-03T06:24:15+5:302020-03-03T06:24:21+5:30
दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : दिल्लीच्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी उमटले. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. अर्थसंकल्पी अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू झाले तेच या विषयावरील गोंधळामुळे.
या गोंधळामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा घोषणा देतच विरोधी सदस्य सभागृहात आले. दिल्लीच्या हिंसाचाराचा पंतप्रधान मोदी यांनी जबाब द्यावा आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या हातात या मागण्यांची पोस्टर्स आणि बॅनर्सही होते. त्यांच्या घोषणा सुरू असतानाच ओम बिर्ला यांनी कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे विरोधक अधिक संतापले. त्यातच भाजपचे संजय जयस्वाल यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त विरोधक जागेवर उभे राहून पोस्टर्स आणि बॅनर्स फडकावू लागले. त्यांच्या घोषणा सुरू असताना भाजपचे रमेश विधुडी व अन्य सदस्यांनी विरोधकांच्या हातातील बॅनर्स खेचण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात धक्काबुक्की सुरू झाली. त्याचे पर्यावसन मारामारीत होईल, असे दिसताच घाईघाईत ओम बिर्ला यांनी संपूर्ण दिवसासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब नेले.
आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे पाहून विरोधकांनी कागद फाडून अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने फेकले. त्यात काँग्रेसचे हरिदास राम्या, गौरव गोगोई, सपाचे शफिक उर रहमान, बसपाचे दानिश अली आणि तृणमूलच्या महुआ मोईत्रा पुढे होते. हा गोंधळ एवढा वाढत गेला की, काँग्रेसतर्फे अधीर रंजन चौधरी आणि भाजपतर्फे स्मृती इराणी व रविशंकर प्रसाद यांनी त्यांना एकमेकांपासून दूर केले.
त्याचवेळी काँग्रेसच्या हरिदास राम्या यांच्या हातातील बॅनर जबरदस्तीने काढून घेण्यासाठी भाजपचे काही सदस्य पुढे सरसावले. महिला सदस्याच्या जवळ पुरुष सदस्य गेल्याने वातावरण आणखी बिघडले; पण कामकाज आधीच तहकूब केले गेल्याने गोंधळ शमला. भाजप सदस्यांच्या या वागण्याबद्दल काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी दिल्लीतील हिंसाचारावर सभागृहात पंतप्रधानांकडून उत्तराची आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक जोरात लावून धरण्याचे ठरविले आहे.
राज्यसभेतही विरोधी सदस्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली होती. सध्याच्या वातावरणात सर्व सदस्यांनी दिल्लीत शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चेस परवानगी नाकारली.
त्यामुळे गोंधळ सुरू होताच त्यांनी सभागृहाचे कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केले. त्याआधी विरोधी
पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीत हिंसाचार सुरू असताना सरकार निष्क्रिय होते, असा आरोप केला.
>लोकसभाध्यक्षांकडे तक्रार
काँग्रेसच्या सदस्य हरिदास राम्या यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे भाजपच्या जसकौर मीना यांनी आपणास सभागृहात मारहाण केल्याची लेखी तक्रार केली आहे.
श्रीमती मीना यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. आपण दलित व महिला असल्याने आपल्याला सभागृहात सतत वाईट वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.