‘कॅशबॅक’मुळे पेटीएमचा गोंधळ; गुगलने दुपारी अॅप हटविले, संध्याकाळी परत केले ‘रिस्टोअर’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:01 AM2020-09-19T01:01:44+5:302020-09-19T06:28:29+5:30
या दिवसभर चाललेल्या गोंधळामुले आपल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न करोडो युजर्सना पडला होता. पेटीएम अॅपच नसेल तर त्यात असलेल्या पैशांचे काय होणार? ते परत मिळणार की नाही? असा प्रश्न त्यांना सतावत होते.
मुंबई : डिजिटल पेमेंट सिस्टिममध्ये मोठा वाटा असलेल्या पेटीएममुळे हे अॅप वापरणारे लाखो लोक दिवसभर गोंधळात सापडले. आॅनलाइन कसिनोचे आणि अवैध जुगार खेळांमध्ये पैसे टाकण्याची सुविधा दिली जात असेल तर ते नियमांचे उल्लंघन आहे, असे स्पष्ट करीत गुगल प्ले-स्टोअरवरून पेटीएम अॅप काढून टाकले होते. मात्र, सायंकाळी पुन्हा हे अॅप डाउनलोड आणि अपडेट्ससाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दिवसभर चाललेला पेटीएमचा गोंधळ अखेर सायंकाळी मिटला.
या दिवसभर चाललेल्या गोंधळामुले आपल्या पैशांचे काय होणार? असा प्रश्न करोडो युजर्सना पडला होता. पेटीएम अॅपच नसेल
तर त्यात असलेल्या पैशांचे काय होणार? ते परत मिळणार की नाही? असा प्रश्न त्यांना सतावत होते. पण गुगलने कारवाई केल्यानंतर पेटीएमने याबाबत खुलासा करीत आम्ही पुन्हा परत येणार असल्याचे म्हटले होते. तुमचे पेटीएमवर असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही नेहमीप्रमाणे व्यवहार करू शकता, असेही कंपनीने स्पष्ट केले होते.
गुगल प्ले-स्टोअरची पॉलिसी काय?
पेटीएम अॅप हटवल्यानंतर गुगलने म्हटले होते की, आम्ही आॅनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. कोणत्याही अॅपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात असेल किंवा जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असतील, तर ते नियमांचे उल्लंघन आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्या अॅप डेव्हलपरला तशी सूचना दिली जाते आणि जोवर संबंधित अॅप प्ले-स्टोअरच्या नियमात न बसण्या-या गोष्टी काढत नाही तोवर ते अॅप प्ले-स्टोअरवरून काढले जाते.
गोंधळ का उडाला?
‘पेटीएम क्रिकेट लीग’ हे आॅनलाइन फिचर पेटीएमवर आहे. त्यावर शुक्रवारी सकाळी कॅशबॅक आॅफर सुरू करण्यात आली होती.
हे फिचर गुगल प्ले-स्टोअरच्या धोरणात बसत नाही, असे गुगलकडून पेटीएमला कळवण्यात आले. याच कारणामुळे काही गुगल प्ले-स्टोअरने कारवाई केल्याचे पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी म्हटले आहे. आता पेटीएम या अॅपमधून कॅशबॅकचा भागच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे ते प्ले-स्टोअरवर पुन्हा उपलब्ध झाले आहे.