सुरळीत कामकाज हीच संगमा यांना श्रद्धांजली...

By admin | Published: March 4, 2016 07:02 PM2016-03-04T19:02:37+5:302016-03-04T19:03:25+5:30

एकापाठोपाठ विश्वासमताचे ठराव लोकसभेने पाहिले आणि यासर्वांचे संचलन करणारे आणि सभागृहातील सर्व घडामोडींचे साक्षीदार होते पूर्णो अगिटोक संगमा

Congratulations to Sangma for smooth functioning ... | सुरळीत कामकाज हीच संगमा यांना श्रद्धांजली...

सुरळीत कामकाज हीच संगमा यांना श्रद्धांजली...

Next

ओंकार करंबेळकर

१९९६ च्या निवडणुकीचे निकाल लागले आणि एका त्रिशंकू लोकसभेला आपल्याला सामोरे जावे लागले. सर्वप्रथम अटलबिहारी वाजपेयी यांना विश्वासमतास सामोरे जावे लागले, मात्र तेरा दिवसांमध्येच त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले, पाठोपाठ एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचे  सरकार त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये सत्तेमध्ये आले. एकापाठोपाठ विश्वासमताचे ठराव लोकसभेने पाहिले आणि यासर्वांचे संचलन करणारे आणि सभागृहातील सर्व घडामोडींचे साक्षीदार होते पूर्णो अगिटोक संगमा. सतत हसतमुख असणाºया या माणसाने या त्रिशंकू वातावरणात सभागृह केवळ चालवले नाहीच तर सदस्यांना शिस्तीचे धडे देत त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणिव करुन दिली. त्यांच्या निधनामुळे केवळ ईशान्य भारतच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातील एक महत्वाची व्यक्ती आपण गमावली आहे.
    एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल, रामविलास पासवान, शरद पवार असे नेते एका बाजूस आणि दुसº़या बाजूस अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, विजयाराजे सिंदीया अशा एकाहून अधिक सरस वक्त्यांची दोन्हीबाजूस मांदियाळी. यासर्वांच्या एकमेकांवर प्रखर टीकेची भाषणे सभागृहात गोंधळ न देता होऊ देण्यास पी. ए. संगमा यांचाच मोठा वाटा होता. गोंधळ घालणाºया किंवा अडथळे आणणाºया सदस्यांना कडक आवाजात ओरडण्याऐवजी कम आॅन... कम आॅन प्लीज अशा शब्दांमध्ये ते शांत करत तर कधी प्लीज बिहेव्ह... व्होल नेशन इज वॉचिंग यू अशा शब्दांमध्ये आपल्याला दूरदर्शनद्वारे सर्व देश पाहात असल्याची जाणीव करुन देत. सभागृह संचलनाचा त्यांनी एकप्रकारे आदर्श वस्तूपाठच यामधून घालून दिला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बोलण्यास उभे असताना विरोधकांबरोबर सत्ताधारी खासदारांचेही आवाज येत असताना, तुमचेच पंतप्रधान बोलत आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपाला सुनावले तेव्हा तत्कालीन मंत्री प्रमोद महाजन यांनी सर, ते आपले सर्वांचे पंतप्रधान आहेत अशी त्यांची चूक लक्षात आणून दिली होती. संगमा यांनी तात्काळ माफी मागत 'अवर' प्राइम मिनिस्टर असे म्हणत स्वत:ची चूक सुधारण्यात मनाचा मोठेपणा दाखवून दिला. त्यांच्या या हसतमुख वागण्याबद्दल लोकसभेच्या सध्याच्या सभापती सुमित्रा महाजनही त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या, 'हसतमुख राहून सभागृहाचे संचलन कसे करावे हे मी संगमा यांच्याकडून शिकले.' 
    संगमा यांचे नाव आणखी एका बाबतीत घ्यावे लागेल ते म्हणजे ईशान्य भारतीय व्यक्तीचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान. १९७७ च्या निवडणुकीपासून संगमा सतत जिंकत आले. २००८ साली संसद सदस्यपदाचा राजीनामा देईपर्यंत ते अधूमधून मेघालयच्या अंतर्गत राजकारणातही ते डोकावत होते. दोन वर्षांसाठी ते मेघालयचे मुख्यमंत्रीही झाले. पण केंद्रामध्ये विविध जबाबदाºया व लोकसभेची अल्पकाळ मिळालेली जबाबदारी यामुळे त्यांनी राष्ट्रीय राजकारणावर स्वत:चा ठसा निर्माण केला आणि स्वत:चे स्थानही मिळविले. त्यांच्यानंतर अगाथा संगमा आणि आता किरेन रिजूजू यांच्या निमित्ताने ईशान्य भारतातील नेतृत्वगुणांचा परिचय आपल्याला होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शेवटी एनपीए असा विविध पक्षांमध्ये त्यांचा राजकीय प्रवास झाला मात्र कडवटपणा, विखारी टीका त्यांच्या हसतखेळत राहण्याच्या स्वभावामुळे कधीही आला नाही. आज वारंवार होणाºया सभागृहातील घोषणाबाजी, अडथळे, ठप्प होणारे प्रश्नोत्तराचे तास अशा वातावरणामध्ये संगमा यांनी सांगितलेल्या वाटेवरुन संसद सदस्यांनी जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होऊ शकेल.

सुवर्णमहोत्सवी सभेचे सभापती
१९९७ साली भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पुर्ण झाल्याबद्दल देशभरामध्ये विविध कार्यक्रम सादर केले गेले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचू एकत्रित विशेष सभा घेण्यात आली. यावेळेस भारतरत्न लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी यांचे गायनही झाले होते. याविशेष सभेचे संचलन करण्याची सुवर्णसंधी पी. ए. संगमा यांना मिळाली होती.

 

Web Title: Congratulations to Sangma for smooth functioning ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.