अभिनंदनचा अर्थच आता बदलेल, पंतप्रधान मोदी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:23 AM2019-03-03T03:23:25+5:302019-03-03T03:23:51+5:30
अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली : अभिनंदनचा अर्थ स्वागत होतो. पण, आता अभिनंदनचा अर्थच बदलून जाईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारतात ही ताकद आहे की, तो डिक्शनरीतील शब्दांचा अर्थ बदलून टाकतो.
अभिनंदन या शब्दाचा अर्थच मुळी आमची ताकद असा झाला आहे. विंग कमांडर अभिनंदन शुक्रवारी रात्री पाकिस्तानातून स्वदेशात परत आले. भारत आणि पाकिस्तानात निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.
>संयुक्त राष्ट्रे प्रमुखांकडून स्वागत
संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलट अभिनंदन यांना परत भारतात परत पाठविल्याच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटारेस यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी ही सकारात्मक बाजू कायम ठेवावी आणि चर्चा करावी. जर दोन्ही देश यासाठी तयार झाले तर संयुक्त राष्ट्रे मध्यस्थीसाठी तयार होतील, असेही ते म्हणाले.
>विंग कमांडर अभिनंदन आपले आपले घरी स्वागत आहे. राष्ट्राला आपल्या साहसाबद्दल गर्व आहे. आमचे सशस्त्र दल देशातील १३० कोटी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
>संरक्षणमंत्र्यांनी घेतली अभिनंदन यांची भेट
केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी भारतात परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची नवी दिल्लीत भेट घेत त्यांची विचारपूस केली. त्यांनी दाखवलेल्या धाडसावर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे, असे सीतारामन यावेळी म्हणाल्या. सीतारामन यांनी यावेळी अभिनंदन यांचे कुटुंबीय आणि हॉस्पिटलमधील स्टाफशीही गप्पा मारल्या. अभिनंदन यांच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याआधी सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी. एस. धनोआ यांची भेट घेतली. पाकिस्तानच्या ताब्यात असताना तिथे त्यांच्यासोबत नेमके काय काय घडले, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कशी वागणूक दिली, याची माहिती धनोआ यांना दिली.
> दबावात सुटका नाही : कुरेशी
इस्लामाबाद : भारतीय पायलट अभिनंदन यांना कोणत्याही दबावात किंवा अगतिकतेमुळे सोडण्यात आले नाही, असे मत पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी व्यक्त केले. तथापि, पाकिस्तानचा निर्णय जिनेव्हा करारानुसार असल्याचे भारताने म्हटले आहे. कुरेशी म्हणाले की, आम्ही भारताला हे सांगू इच्छितो की, आम्ही आपले दु:ख वाढवू इच्छित नाही. आपल्या नागरिकांची परिस्थिती दयनीय होऊ नये, शांतता रहावी, असे आम्हाला वाटते. पाकिस्तान भूतकाळात जाऊ इच्छित नाही. जर भूतकाळात गेलोच तर आम्हाला हेही पहावे लागेल की, संसद, पठाणकोट आणि उरीचे हल्ले कसे झाले? ही एक मोठी कहाणी आहे.