निवडणुकीआधीच काँग्रेस अडचणीत ? प्रशांत किशोर यांच्यापासून घेतली फारकत
By admin | Published: November 8, 2016 08:12 AM2016-11-08T08:12:50+5:302016-11-08T08:12:50+5:30
प्रशांत किशोर यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांची भेट घेतल्याने काँग्रेस पक्षात नाराजी होती असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - काँग्रेस पक्षाने रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यापासून फारकत घेतली असून सर्व करार रद्द केले आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. प्रशांत किशोर यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांची भेट घेतल्याने काँग्रेस पक्षात नाराजी होती असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. याअगोदर निवडणूक व्यूहरचनेसाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर काँग्रेस नेत्यांच्या प्रखर टीकेमुळे कमालीचे अस्वस्थ असून, टीका करण्याची ही मालिका बंद झाली नाही, तर उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वी ते काँग्रेस सोडून जाण्याची दाट शक्यता होती असंही वृत्त होतं.
उत्तर प्रदेश निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात यावी यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत होते, पण काँग्रेसने यासाठी असहमती दर्शवली. प्रशांत किशोर यांच्या मुलायम सिंग आणि अमर सिंग भेटीबाबत पक्षाला काहीच कल्पना देण्यात आली नव्हती असं काँग्रेसने सांगितलं आहे. प्रशांत किशोर हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जात असून खासकरुन उत्त रप्रदेश आणि पंजाब निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
याअगोदर प्रशांत किशोर आणि उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं सुत्रांकडून कळलं होतं. प्रशांत किशोर यांनी काँग्रेससोबत युती तोडल्यास आश्चर्य वाटणार नाही असंही एका वरिष्ठ नेत्याने म्हटलं होतं. पंजाब काँग्रेस प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंगदेखील प्रशांत किशोर यांच्यावर नाराज होते.