भाजपाच्या हल्ल्याला काँग्रेसही देणार चोख उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2016 10:47 PM2016-04-26T22:47:25+5:302016-04-26T23:46:00+5:30
सोनिया गांधी यांचा नामोल्लेख करून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्याचा निर्णय भाजपाने घेतला असून, त्याला तसेच जोरदार प्रत्युत्तर देण्याचे काँग्रेसनेही ठरवले आहे.
हरीश गुप्ता: नवी दिल्ली
३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यात झालेल्या कथित भ्रष्टाचारावरून बुधवारी संसदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा नामोल्लेख करून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे काँग्रेसनेही ठरवले आहे. डॉ. मनमोहन सिंग सरकारने या कंपनीला ब्लकलिस्ट केले होते. तिला मोदी सरकारने काळ्या यादीतून बाहेर काढले, असा सवाल काँग्रेसतर्फे करण्यात येईल.
या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यातील भ्रष्टाचाराबाबत इटलीच्या मिलान कोर्ट आॅफ अपील्स या न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत मंगळवारी दिल्लीत वितरित करण्यात आली. फिन्मेक्कानिया या संरक्षण क्षेत्रातील कंपनीने संपुआ सरकारच्या काळात काही राजकीय नेते, नोकरशहा, भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि अन्य लोकांना किमान ३० दशलक्ष पौंडची लाच दिल्याचे निकालपत्रात म्हटल्याचे सांगण्यात येते. मात्र सीबीआयला या निकालाची प्रत मिळाली नसून, ती मिळाल्यावर तिचे आम्ही इंग्रजीत भाषांतर करू आणि मगच त्याविषयी काय ते सांगू, असे सीबीआयतर्फे सांगण्यात आले.
फिन्मेक्कानिया ही अगुस्ताची मूळ कंपनी आहे. तपास अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण दस्तऐवज उपलब्ध करून न दिल्याबद्दल इटालियन न्यायालयाने संपुआ सरकारवर टीका केली आहे. संपुआ सरकारचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या वापरासाठी १२ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा सौदा या कंपनीशी करण्यातआला होता. भारताशी २०१० मध्ये झालेल्या या सौद्यात भ्रष्टाचार झाला आहे, असा विश्वास ठेवण्यास वाव आहे, असे या न्यायालयाने म्हटले आहे. तथापि भारतीय नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे मात्र न्यायालयाने दिलेले नाही. केवळ मध्यस्थांनी लाच घेतल्याचे त्यात नमूद केले आहे.
भाजपाच्या मीनाक्षी लेखी यांनी सोमवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाचे भूपेंद्र यादव यांनीही लाचेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तराखंडवरून सभागृहांत गदारोळ झाल्याकारणाने हा मुद्दा बाजूला पडला. त्यामुळे बुधवारी हेलिकॉप्टर सौद्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा संपूर्ण ताकदीनिशी उपस्थित करून बाजू काँग्रेसवर उलटविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
दरम्यान, इटालीच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत मिळवण्यासाठी सीबीआयने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यावर आम्ही तिचे योग्य व्यक्तीकडून भाषांतर करून मग अभ्यास करू, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. तोपर्यंत त्याविषयी काही बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की आम्ही देशातील चौकशीचे काम पूर्ण केले असून, अन्य देशांतील तपासाबाबत पाठपुरावा करणे सुरू आहे.
माजी हवाईदलप्रमुखांवर आरोप
२०१० च्या अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यात भ्रष्टाचार झाला, यावर विश्वास ठेवण्यालायक कारणे आहेत आणि या भ्रष्टाचारात माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी दोषी आहेत, असे इटालियन न्यायालयाने म्हटले आहे.
‘१० ते १५ दशलक्ष डॉलर्सचा एक भाग अवैध निधीच्या रूपात भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे कायदेशीररीत्या सिद्ध झालेले आहे,’ असे मिलान कोर्ट आॅफ अपील्सने आपल्या २२५ पानांच्या निकालपत्रात म्हटले आहे. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदीचे कंत्राट अगुस्ता वेस्टलँड या कंपनीला मिळावे यासाठी त्यागी यांनी हस्तक्षेप केला, असे यात नमूद केले आहे. त्यागी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्यागी यांची इटलीच्या न्यायालयापुढे साक्ष झाली नाही. परंतु भारतात सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीचा ते सामना करीत आहेत.
काँग्रेसचा पलटवार
डॉ. मनमोहन सिंग सरकारनेच कंपनीला ब्लॅकलिस्ट केले होते. तसेच तिची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयातर्फे चौकशी करण्याचे आदेश संपुआ सरकारनेच दिले होते. त्यामुळे अद्याप चौकशी पूर्ण का करण्यात आली नाही आणि या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने का केले, असा पलटवार काँग्रेसने भाजपावर केला आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणे चुकीचे व अयोग्य आहे. भाजपा नेते अत्यंत बेजबाबदार विधाने व आरोप करीत असून, काँग्रेस कधीही ते सहन करणार नाही. या विषयावर संसदेत चर्चा झाल्यास त्यापासून आम्ही पळून जाणार नाही. मात्र दोन वर्षांत या प्रकरणाचा तपास पूर्ण का झाला नाही, याचे उत्तर भाजपाने आणि मोदी सरकारने द्यायलाच हवे.