काँग्रेस व मित्रपक्षांनी लढाई अर्ध्यावरच सोडली - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:16 AM2019-05-09T05:16:08+5:302019-05-09T05:17:02+5:30
काँग्रेस व मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडली असून, त्यामुळे भाजपच पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार हे स्पष्ट आहे असा दावा पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केला.
फतेहबाद - काँग्रेस व मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडली असून, त्यामुळे भाजपच पुन्हा केंद्रात सत्तेवर येणार हे स्पष्ट आहे असा दावा पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केला.
निवडणूक प्रचार सभेत ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा वाढला आहे. यंदाच्या निवडणुकांतही जनतेचा आम्हालाच पाठिंबा आहे हे २३ मे रोजी लागणाऱ्या निकालांतून दिसून येईल. फिर एक बार मोदी सरकार ही घोषणा खरी होणार आहे.
काँग्रेस व विरोधी पक्षांच्या आघाडीने निवडणुकांची लढाई अर्ध्यावरच सोडून दिली आहे. देशामध्ये दुबळे सरकार यावे, अशी विरोधी पक्षांची इच्छा धुळीला मिळणार आहे. काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचे पीक घेतले. हरियाणा व अन्य राज्यांमध्ये याचे अनेक पुरावे सापडतील. निवडणुकांचे आतापर्यंत पाच टप्पे पार पडले आहेत. सहाव्या टप्प्यात १० लोकसभा जागांसाठी १२ मे रोजी मतदान आहे. (वृत्तसंस्था)
नोकऱ्यांचा मुद्दा चर्चेत
हरीयाणामध्ये मोदी, जाट व नोक-या हे तीन मुद्दे प्रचारात प्रभावी ठरले आहेत. मोदी सरकारच्या बाजूने किंवा विरोधात जोरात प्रचार सुरू आहे. या राज्यात जाट समुदायाची संख्या २६ टक्के आहे. जाटांनी आपल्या मागण्यांसाठी पूर्वी हिंसक आंदोलन केले होते. त्यांच्या मागण्या मान्य करू असा पवित्रा सर्वच पक्षांनी घेतला आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे.
अनेकांना आम्ही सरकारी नोक-यांत सामावून घेतले असल्याचा दावा भाजप करत आहे, तर काँग्रेसने ‘न्याय’ योजनेला प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.