लोकसभेत काँग्रेस व भाजप आरोप-प्रत्यारोप
By admin | Published: February 25, 2016 03:27 AM2016-02-25T03:27:57+5:302016-02-25T03:27:57+5:30
जेएनयू व रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे जोरदार पडसाद बुधवारी लोकसभेत उमटले. सत्ताधारी भाजपवर टीकेचा भडिमार करीत काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेंनी सरकारवर चौफेर
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
जेएनयू व रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचे जोरदार पडसाद बुधवारी लोकसभेत उमटले. सत्ताधारी भाजपवर टीकेचा भडिमार करीत काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेंनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला, तर उत्तरादाखल भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी सोनिया आणि राहुल गांधींवर प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेसच्या देशभक्तीवरच प्रश्न उपस्थित केले.
या दोन संवेदनशील प्रकरणांवर लोकसभेतील चर्चेच्या वेळी सभागृहात सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या ठिणग्या उडत होत्या. शिंदेंच्या भाषणात सत्ताधारी सदस्य अडथळे आणीत होते, तर अनुराग ठाकूर यांच्या भाषणावर काँग्रेस सदस्य आक्षेप नोंदवीत होते.
लोकसभेत चर्चेला सुरुवात करतानाच काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे बरसले, अफजल गुरूला शहीद मानणाऱ्या पीडीपीबरोबर ज्या भाजपने काश्मीरमध्ये आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे काँग्रेसच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची भाजपची पात्रताच नाही. देशाची अखंडता व एकात्मतेसाठी आमच्या दिवंगत पंतप्रधानांनी आणि अनेक नेत्यांनी बलिदान केले आहे. देशविरोधी घोषणांशी काँग्रेस कधीही सहमत नव्हती आणि नाही.
जेएनयूमध्ये ८ विद्यार्थ्यांवर खरेखोटे आरोप ठेवताना भाजपकडून जेएनयूमधील ८ हजार विद्यार्थ्यांना कलंकित करण्याचा उपद्व्याप केला जात आहे. कोर्टाच्या आवारात भाजपसमर्थक वकीलच मारहाण करून कायदा हातात घेत आहेत. पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत.
ज्योतिरादित्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने हिमाचल प्रदेशच्या अनुराग ठाकूर यांना उतरवले. आक्रमक स्वरात ठाकूर म्हणाले की, सीमेवर देशाचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्या जवानांची काँग्रेसला पर्वा नाही. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात ठार झालेल्या इन्स्पेक्टर शर्मांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला गांधी कुटुंबातला कोणीही त्यांच्या घरी गेला नाही. मात्र, जेएनयूमधील दहशतवादाचे आरोप असलेल्यांचे समर्थन काँग्रेसने केले.
जेएनयूमध्ये राहुल गांधी देशद्रोही घोषणा देणाऱ्यांना साथ देण्यासाठी गेले होते काय? संसदेवरील हल्ला प्रकरणात ज्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली तो अफजल गुरू दहशतवादी होता की नाही? संसदेवर हल्ला करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष उभा आहे काय? या प्रश्नांची उत्तरे आपणास सोनिया गांधींकडून हवी आहेत.
लोकसभेतील या संवेदनशील चर्चेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांचीही भाषणे झाली.
काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांचा सरकारवर हल्लाबोल
1 देशविरोधी घोषणांच्या आरोपांच्या चित्रफिती कितपत खऱ्या, याबाबत संशय व अनेक प्रश्नचिन्हे आहेत. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणारा रोहित वेमुला दलित आहे की नाही, असा लांच्छनास्पद वाद केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित करतात.
2 जातीच्या आधारे एका विद्यार्थ्याच्या आयुष्याची किंमत ठरवण्याचा हा अधिकार केंद्र सरकारला कोणी दिला, असा चौफेर टीकेचा भडिमार करीत काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेंनी भाजप आणि रा.स्व. संघावर हल्लाच चढवला.
साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांची विधाने उद्धृत करीत ज्योतिरादित्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेहरू विद्यापीठ कायमचे बंद पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोपही केला.