प्रणव मुखर्जींच्या संघभेटीच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:14 AM2018-05-30T05:14:56+5:302018-05-30T05:14:56+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात जून रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला मोठाच धक्का बसला आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात जून रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला मोठाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही याबाबत मुखर्जी यांच्यावर टीका होत आहे. मात्र मुखर्जी यांच्या कार्यालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे अत्यंत वरिष्ठ नेते सध्या मुखर्जी यांच्या या निर्णयावर चांगलेच नाराज आहेत. परंतु त्यावर कोणी काही बोलायला तयार नाही. पक्ष प्रवक्त्याने मुखर्जी हे माजी राष्ट्रपती असून, त्यांच्या निर्णयावर पक्ष काही प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हटले. सर्वाेच्च राष्ट्रपतीपद भूषवल्यानंतरही मुखर्जी यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अजून कायम आहे व आगामी निवडणुकीत स्पष्ट जनादेश न मिळाल्यास ते पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकतात, अशीही चर्चा आता सुरु आहे.
काँग्रेसमध्ये मुखर्जींच्या निर्णयाने खळबळ निर्माण झाली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र आनंदात आहे. संघाचे ज्येष्ठ नेते राकेश सिन्हा म्हणाले की, प्रणव मुखर्जी यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे व संघ आणि हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारणाºयांना यातून मोठा संदेश मिळेल. मुखर्जी हे कार्यक्रमात संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन म्हणून काय भाषण करतात, याकडे काँग्रेसचे आता लक्ष आहे. आपल्या कार्यक्रमातील उपस्थितीद्वारे मुखर्जी संघाच्या विचारधारेलाच मान्यता देत आहेत, अशी टीका एका काँग्रेस नेत्याने खासगीत केली. मुखर्जी हे सुरवातीपासूनच धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते असून, त्यांच्या संघातील कार्यक्रमाच्या हजेरीने काँग्रेसच्या विचारप्रवाहाला धक्का बसेल, असे काही ते बोलणार नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडकन यांनी स्पष्ट केले की संघ आणि काँग्रेस यांची वैचारिक बैठक परस्परविरोधी असून, त्याची जाणीव मुखर्जी यांना आहे.
याचे उत्तर माजी राष्टÑपतीच देऊ शकतील - काँग्रेस
माजी माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी प्रणव मुखर्जी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारता ते म्हणाले की, फक्त तेच उत्तर देऊ शकतील. पक्षाचे नेते पी. चिदम्बरम, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद आदींनी मुखर्जी यांच्या त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे प्रणव मुखर्जी यांना माहीत असतानाही त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे.