परदेश दौऱ्यांवरून काँग्रेस-भाजपत रण
By Admin | Published: September 25, 2015 12:37 AM2015-09-25T00:37:22+5:302015-09-25T00:37:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात चांगलीच जुंपली आहे
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात चांगलीच जुंपली आहे.
काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत लपवाछपवी करीत असल्याचा भाजपाचा आरोप आहे तर काँग्रेसने मोदींच्या विदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भाजपा प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिम्हा राव यांनी राहुल यांच्या अमेरिका दौऱ्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आस्पेन इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाचा उल्लेख करीत राव म्हणाले की, ‘वीकएण्ड विथ चार्ली रोझ’ हा कार्यक्रम २५ जून ते ४ जुलैदरम्यान आयोजित केला गेला होता.
विशेष म्हणजे राहुल गांधी या नावाच्या कुठल्याही व्यक्तीने या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता व भविष्यातही अशी व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होण्याचे नियोजित नाही, असे खुद्द आस्पेनच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या भारतातील अनुपस्थितीमागचे खरे कारण काँग्रेस दडवू पाहत असल्याचा आरोपही राव यांनी केला.
मोदी जपानला गेले तेव्हा ३.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर चीन भेटीत १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन त्यांनी दिले होते. ही गुंतवणूक आली काय? मोदींच्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्याच्या वेळीही असेच घडले.
शेकडो डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले होते. आता त्या सर्व गुंतवणुकींचे काय झाले, असा सवाल सुरजेवाला यांनी केला.
राहुल हे ‘वीकएण्ड विथ चार्ली रोझ’ या परिषदेसाठी अमेरिकेला गेल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र भाजपने काँग्रेसचा हा दावाच खोटा ठरवताना अमेरिकेतील ज्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी गेल्याचे सांगण्यात येत आहे, तो जुलैतच पार पडला असल्याचा प्रतिदावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याचा प्रारंभ केला असतानाच काँग्रेसने त्यांच्या विदेश दौऱ्यांवर जोरदार हल्ला चढवीत, १५ महिन्यांत २९ देशांचा दौरा करणारे ‘एनआरआय पंतप्रधान’ अशी त्यांची संभावना केली आहे.
मोदींच्या या विदेश दौऱ्यांमधून भारताने काय साध्य केले, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला.
‘पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवर जनतेचे किमान २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या विदेश दौऱ्यांपासून काय साध्य झाले’, असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘आपल्या अनिवासी भारतीय पंतप्रधानांचा हा २९ वा विदेश दौरा आहे. मोदी १५ महिन्यांपासून सत्तेवर आहेत आणि या १५ महिन्यांतील साडेतीन महिने परदेशात घालविले आहेत. आता आपले एनआरआय पंतप्रधान पुन्हा एकदा स्वप्रचार आणि सेल्फी काढण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या वारंवार होणाऱ्या या विदेश दौऱ्यांमधून काय साध्य झाले आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येणार, या त्यांच्या आश्वासनाचे काय झाले?