काँग्रेसने हिटलरशी केली किरण बेदींची तुलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:52 PM2017-07-21T14:52:08+5:302017-07-21T14:59:54+5:30

पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी आणि राज्य सरकारदरम्यान सुरु असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे

Congress compares Kiran Bedi to Hitler | काँग्रेसने हिटलरशी केली किरण बेदींची तुलना

काँग्रेसने हिटलरशी केली किरण बेदींची तुलना

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
पुदुचेरी, दि. 21 - पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी आणि राज्य सरकारदरम्यान सुरु असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. किरण बेदी यांनी शुक्रवारी सकाळी काही वृत्तपत्रांचे फोटो ट्विट केले आहेत, ज्यामध्ये काही पोस्टर्स छापण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये  किरण बेदींची तुलना हुकूमशहा हिटलरशी करण्यात आली आहे. पोस्टर्समध्ये किरण बेदींना हुबेहूब हिटलरप्रमाणे दाखवण्यात आलं आहे. 
 
आणखी वाचा
पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी किरण बेदी
पुन्हा निवडणूक लढणार नाही - किरण बेदी
 
किरण बेदी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "आता या पुस्तकात अजून एका धड्याची नोंद झाली आहे, ज्यामध्ये लेखक स्वत: सामील आहे". हे पोस्टर्स राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरण बेदी आणि पुदुचेरी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसून वाद सुरु आहे. 
 
काही वेळापुर्वी मुख्यमंत्री नारायणस्वामी आणि नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यामधील संबंध ताणले गेले होते. ज्यानंतर दोघांमधील वाद उघडपणे समोर येण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी किरण बेदींवर आपल्या मर्यादा ओलांडत अधिकार क्षेत्रातून बाहेर जाऊन काम करत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच राज्य सरकारची गुप्त माहिती किरण बेदी ट्विटरच्या माध्यमातून उघड करत असल्याचा आरोपही नारायणसामी यांच्याकडून कऱण्यात आला. 
 
पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश आहे. 2016 रोजी विधानसभा निवडणूका पार पडल्या होत्या. काँग्रेस - डीएमके युतीने 30 जागांच्या विधानसभेत 17 जागा जिंकत निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलं होतं. नारायणसामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. मे महिन्यात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी 23व्या नायब राज्यपाल म्हणून जबाबदारी हाती घेतली होती. याआधी भाजपाने किरण बेदी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र त्यांच्या नेतृत्वात भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 
 
अण्णा हजारेंच्या जनआंदोलनातून किरण बेदींचा चेहरा लोकांसमोर आला. अण्णांच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. कालांतरानं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषितही करण्यात आलं. त्यांनी देशातल्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मानही मिळवला आहे. किरण बेदींच्या माध्यमातून पुद्दुचेरीवर वर्चस्व राखण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. 
 

Web Title: Congress compares Kiran Bedi to Hitler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.