आघाडी व संयुक्त प्रचाराबाबत काँग्रेस संभ्रमात
By Admin | Published: January 15, 2017 12:53 AM2017-01-15T00:53:59+5:302017-01-15T00:53:59+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करावयाचा पक्षाचा जाहीरनामा, लढविण्यात येणाऱ्या जागांची नेमकी संख्या आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपासोबत
- व्यंकटेश केसरी, नवी दिल्ली
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध करावयाचा पक्षाचा जाहीरनामा, लढविण्यात येणाऱ्या जागांची नेमकी संख्या आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपासोबत आघाडी केल्यानंतर संयुक्तरीत्या प्रचार कसा करायचा, या मुद्यांवरून काँग्रेस पक्ष अद्यापही संभ्रमात आहे.
‘आम्ही १०३ जागा मागितल्या आहेत. परंतु ८० ते ८८ जागा मिळतील अशी आशा आहे. या मुद्यावर राहुल गांधी आणि अखिलेश यादव हेच निर्णय घेतील,’ असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी अतिशय जवळीक असलेल्या अ. भा. काँग्रेस कमिटीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक जाहीरनामा जारी करणार काय, असे विचारले असता, ‘याबाबत खुद्द निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्षच अंधारात आहेत,’ अशी माहिती या पदाधिकाऱ्याने दिली. पक्षाच्या कार्यक्रमावर मत मागणार की अखिलेश सरकारच्या कामगिरीवर, या एका प्रश्नाच्या उत्तरात हा पदाधिकारी म्हणाला, याबाबतही अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. सपातील फुटीमुळे सरकारविरोधी लाट निष्प्रभ ठरेल आणि सपा, काँग्रेस व रालोद यांची महाआघाडी भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवेल, असा काँग्रेसच्या व्यवस्थापकांना विश्वास आहे’.
राज्यात अन्य पक्षांसोबत आघाडी करायची की स्वबळावरच लढायचे, या मुद्यावरून कायम असलेला संभ्रम आणि समाजवादी पार्टीतील कौटुंबिक भांडण यामुळे राज बब्बर यांच्या अध्यक्षतेखालील प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रचार कमिटी आणि अन्य कमिट्या सध्यातरी निष्क्रियच आहेत, असे पक्षाचे तिकीट मिळविण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीत मुक्काम ठोकून असलेल्या उत्तर प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
काँग्रेसला बसपा किंवा सपाशी आघाडी करून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस व राज्याचे प्रभारी गुलाम नबी आझाद हे सुरुवातीपासूनच सांगत आले आहेत. परंतु आपला पक्ष स्वबळावरच निवडणुका लढणार हे बसपाप्रमुख मायावती यांनी स्पष्ट केले आहे.
- उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्यात आघाडी होईल का, काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स आतापासूनच तिथे दिसू लागली आहेत.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप एकाही उमेदवाराचे नाव निश्चित केलेले नाही. तर अखिलेश यादव यांच्यासाठी आपण माघार घेणार असल्याचे काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी नुकतेच जाहीर केले होते.