काँग्रेसची मोदींवर टीका
By admin | Published: July 4, 2016 05:56 AM2016-07-04T05:56:11+5:302016-07-04T05:56:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘रालोआ’ सरकार दोन वर्षांच्या कारकिर्दीत भरीव काम केल्याचा डंका पिटत असले तरी प्रत्यक्षात मोदी या सरकारच्या घोर अपयशाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत, अशी विखारी टिका काँग्रेस पक्षाने केली आहे.
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका विश्लेषणात्मक टिपणीत पक्षाने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे वचनभंगाचे ‘पोस्टर बॉय’ ठरले आहेत. त्यांचे संपूर्ण सरकार आणि त्याची धोरणे फसवणूक आणि खोटेपणाच्या पायावर आधारलेली आहेत.
लोकसभा निवडणुकीत मोदींनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली व सत्याच्या आविर्भावात देशभर असत्याचा प्रचार केला. परंतु सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत मोदी यांचे सर्व खोटे दावे पार उघडे पडले आहेत.
पक्षाच्या मते मोदी सरकार विविध क्षेत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरले आहे याचा सविस्तर उहापोह करून या विश्लेषणात काँग्रेस पक्ष शेवटी म्हणतो: मोदीजी जेव्हा पंतप्रधान पदावरून पायउतार होतील तेव्हा भारत छिन्नविच्छिन्न व गलितगात्र झालेला असेल. पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशावर लादलेल्या खोटेपणाच्या शासनाविरुद्ध लढा देऊन देशाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
मोदीजी आणि त्यांचे ससरकार हा भारतातील मध्यमवर्ग व गरिबांना अभिशाप ठेरले आहे, असा आरोप करून काँग्रेस पक्ष म्हणतो की, डाळींच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत व पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत मात्र मोदी गप्प आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी मोदी जगभर फिरण्यात मग्न आहेत.
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या कथित अपयशाचा पाढा वाचताना काँग्रेस म्हणते की, मोदींच्या जगभर फिरण्याचे भारताची प्रतिष्ठा व स्थान वाढले असे त्यांचे पाठीराखे म्हणतात.
पण गुरदासपूर, पठाणकोट व पाम्पोरचे अतिरेकी हल्ले, सीमेवरील शस्त्रसंधीची एक हजार उल्लंघने, एनएसजीचे सभासदत्व मिळविण्यात झालेली भारताची फजिती आणि रशिया, अमेरिका व चीनची पाकिस्तानशी वाढती जवळीक ही या परराष्ट्र धोरणाची फलश्रुती आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>काँग्रेसने केलेला लेखाजोखा
ंकाँग्रेस पक्ष म्हणतो, मोदीजींनी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. आपल्या राजवटीत अर्थव्यवस्था भरभराटीला आली असा दावा त्यांनी केला़ मात्र सरकार फक्त १.३५ लाख नव्या नोकऱ्या देऊ शकले. याउलट संपुआ सरकारने सन २०११ या एकाच वर्षात ९ लाख नोकऱ्या दिल्या होत्या.
>आश्वासन वास्तव
वर्षाला दोन कोटी नोकऱ्या गतवर्षी दोन कोटी बेरोजगार
प्रत्येक बँक खात्यात १५ लाख एक दमडीही नाही
महागाईला हद्दपार करू तूरडाळ २०० रु. किलो
पाकला अद्दल घडवू शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
इंधन स्वस्त करू तेल ५८ टक्के, पेट्रोल ८ टक्के स्वस्त