काळ््या पैशावाल्यांसाठी काँग्रेस लढतोय : भाजपा
By admin | Published: April 4, 2017 05:13 AM2017-04-04T05:13:15+5:302017-04-04T05:13:15+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली
नितीन अग्रवाल,
नवी दिल्ली- काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या बाजुने काँग्रेस लढत असल्याचा आरोप भाजपाने केला व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली.
भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव रविवारी पक्षाच्या येथील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘‘काँग्रेस काळ््यापैशाच्या विरोधात नाही तर काळा पैसा बाळगणाऱ्यांसाठी लढत आहे. वीरभद्र सिंह संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये केंद्रात मंत्री असताना त्यांनी सफरचंदांच्या उत्पादनातून सहा कोटी रुपयांचा नफा झाल्याचे आयकर विवरणपत्रात नमूद केले होते. त्याआधी व त्यानंतर त्यांना सफरचंदांच्या बागांतून मिळणारे उत्पन्न शून्य होते.’’ ज्या वाहनांतून सफरचंदे बाजारात पोहचवण्यात आली ती वाहने स्कूटर व मोटारसायकली होत्या, असाही आरोप यादव यांनी केला.
भूपेंद्र यादव यांनी वीरभद्र सिंह यांच्या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. राहुल गांधी स्वत:ला शेतकऱ्यांचे हितरक्षणकर्ते समजतात मग त्यांनी वीरभद्र सिंह यांनी कमावलेल्या नफ्याचे गणित देशाला समजावून सांगितले पाहिजे.
देशातील कष्टकरी शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. गांधी हे काहीच बोलत नसल्यामुळे त्यांच्या हेतुबद्दल शंका येत आहे. वीरभद्र सिंह यांचा राजीनामा काँग्रेसने घेतला नाही तर याचा अर्थ असा होईल की भ्रष्टाचाराशी तडजोड करणारा हा पक्ष आहे, असे यादव म्हणाले.
गेल्याच आठवड्यात वीरभद्र
सिंह यांची माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करा ही मागणी
करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. वीरभद्र
सिंह यांनी त्यांच्यावरील केंद्रीय गुप्तचर खात्याने केलेले आरोप हे राजकीय हेतुंनी प्रेरीत असल्याचेही म्हटले आहे.
>सपचा प्रवक्ता भाजपात
समाजवादी पक्षाचे प्रवक्तेपद भूषवलेले गौरव भाटिया रविवारी भाजपात दाखल झाले. त्यांनी पक्ष मुख्यालयात पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना भाटिया उत्तर प्रदेशचे अवर महाअधिवक्ता होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाटिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
भाजपामध्ये दाखल झाल्यावर भाटिया यांनी समाजवादी पक्षातील घराणेशाहीमुळे दु:खी होऊन पक्षाशी नाते तोडल्याचे सांगितले. आत्म्याने हाक दिल्यामुळे मी भाजपात आल्याचा दावा गौरव भाटिया यांनी केला.