काँग्रेसची ‘नौटंकी’ लज्जास्पद !
By admin | Published: December 20, 2015 01:42 AM2015-12-20T01:42:21+5:302015-12-20T01:42:21+5:30
भाजपाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना त्यांच्या वक्तव्यावरून ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी नव्हेतर स्वातंत्र्यसेनानी
प्रथमच कुणाला भ्रष्टाचारासाठी लढताना बघितले
नवी दिल्ली : भाजपाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना त्यांच्या वक्तव्यावरून ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आरोपी नव्हेतर स्वातंत्र्यसेनानी असल्यासारखे वाटते, अशी टीका केली. सोबतच न्यायालयीन प्रकरणाचे राजकारण करू नका, असा सल्लाही दिला.
नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया व राहुल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर काँग्रेस नेत्यांनी सरकारवर हल्ला चढविला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रस्त्यावर नौटंकी करून ते अत्यंत लज्जास्पदरीत्या भ्रष्टाचारासाठी लढत असल्याचा आरोप भाजपाने केला. या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, न्यायालयात जे घडले त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही. परंतु न्यायालयाबाहेर जी बयाणबाजी आणि नौटंकी झाली त्यावर आम्ही निश्चितपणे बोलू. नेहमी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला जातो. परंतु देशाच्या इतिहासात प्रथमच कुणाला भ्रष्टाचारासाठी लढताना बघितले आणि तेसुद्धा अत्यंत लज्जास्पदपणे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातील हे प्रकरण राजकीय सूडभावनेतून दाखल करण्यात आले आहे. कुणाला एक पैसाही मिळणार नाही हे कंपनी कायद्यात स्पष्ट आहे. मग पैशाच्या गैरव्यवहाराचा प्रश्नच कुठे उद्भवतो?
- तरुण गोगोई, मुख्यमंत्री, आसाम
भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राजकीय सूडभावनेला कुठलेही स्थान नाही. येथील लोकांना कायद्यावर विश्वास आहे आणि काँग्रेस पक्षानेही ही लढाई कायदेशीर मार्गाने लढण्याचे ठरविले आहे हे सोनिया व राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून दाखवून दिले आहे.
- डी. राजा, राष्ट्रीय
सचिव, भाकपा