काँग्रेसनेच भारतात घराणेशाही आणली
By Admin | Published: June 27, 2016 04:13 AM2016-06-27T04:13:51+5:302016-06-27T04:13:51+5:30
देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला.
नवी दिल्ली : देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला. तब्बल दोन दशके रखडलेल्या आर्थिक सुधारणा, भारताची लोकशाही ‘घराणेशाही’त परिवर्तीत आणि भ्रष्टाचारास सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे, असा स्पष्ट आरोप जेटली यांनी केला.
काँग्रेसच्या खात्यात आणीबाणीशिवाय सुवर्ण मंदिरातील आॅपरेशन ब्लू स्टार राबविल्याचाही कलंक लागलेला आहे. या मुद्यांवर सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचे काही
मत आहे काय? स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस पक्षावर दृष्टिक्षेप टाकला
तर या पक्षावर आर्थिक सुधारणांमध्ये दोन दशकांचा विलंब लावणे, भारताच्या लोकशाहीचे घराणेशाहीत रूपांतर करणे, १९७५ मध्ये आणीबाणी लागू करणे, आॅपरेशन ब्लू स्टार आणि भ्रष्टाचार यांसारखे
अनेक कलंक लागले आहेत, असे जेटली म्हणाले.
४१ वर्षांपर्वी २६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानिमित्त ‘४१ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेली संवैधानिक हुकूमशाही’ या शीर्षकाखाली जेटली यांनी
आपल्या फेसबुक पोस्टवर हे भाष्य केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>हुकूमशाही आणली
‘आणीबाणीचा परिणाम देशात हुकूमशाही लागू करण्यात झाला. सर्व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणी करण्याचे न्यायालयांचे अधिकार काढून घेण्यात आले.
हुकूमशाहीपुढे न्यायालय नतमस्तक झाले. प्रेस सेंसॉरशीप लागू करण्यात आली. मीडियाही हुकूमशहांचा प्रवक्ता बनला. सार्वजनिक स्थळी निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली. त्यावेळी संसदेत विरोधी पक्षही नव्हता.
हुकूमशहाने आपला पुत्र संजयला आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे करून भारताला घराणेशाही व्यवस्थेत रूपांतरित केले. पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा गळा आवळण्यात आला,’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.