या अभिनेत्रीकडे काँग्रेसने दिली मीडिया सेलची जबाबदारी
By Admin | Published: May 10, 2017 09:35 PM2017-05-10T21:35:28+5:302017-05-10T21:35:41+5:30
काँग्रेसमध्ये ज्या बदलांची मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात होती, त्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - काँग्रेसमध्ये ज्या बदलांची मागणी मागील अनेक महिन्यांपासून केली जात होती, त्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. माध्यमांच्या वृ्त्तानुसार काँग्रेसने दीपेंदर सिंह हुड्डा यांच्या जागी कर्नाटकच्या माजी खासदार व कन्नड अभिनेत्री राम्या यांना पक्षाच्या सोशल मीडिया टीमचे प्रमुखपद दिले आहे. पार्टीला सोशल मीडियामध्ये अधिक आक्रमक बनविण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. ही टीम काँग्रेसची अधिकृत वेबसाइट, ट्विटर, फेसबुक सारखे अकाउंटची जबाबदारी सांभाळेल.
राम्या यांची आई रंजीता कर्नाटकमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या होत्या. तर त्यांचे वडील आर टी नारायण एक प्रसिद्ध उद्योगपती होते. 2001 मध्ये भारतीय यूथ काँग्रेस ज्वाइन करणारी राम्या 2013 मध्ये मांड्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन संसदेत पोहोचली. परंतु 2014 मध्ये ती पराभूत झाली.
अनेक हिट चित्रपट देणाऱ्या ग्लॅमरस राम्या यांना कन्नड सिनेमाची गोल्डन गर्ल म्हटले जाते. लोकसभेत निवडून आलेली ही पहिली कन्नड अभिनेत्री आहे. 29 नोव्हेंबर 1982 रोजी जन्मलेल्या राम्या यांचे मूळ नाव दिव्या स्पंदना आहे. 2003 मध्ये कन्नड फिल्म अभी पासून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या दिव्या स्पंदनाने आपले नाव बदलून राम्या ठेवले होते. तिने कन्नडशिवाय काही तमिल आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.