ईशान्येकडील दुर्लक्ष काँग्रेसला भोवले; नागालँड, त्रिपुरामध्ये खातेही उघडता आले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 03:46 AM2018-03-04T03:46:52+5:302018-03-04T03:46:52+5:30
मेघालयात बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसची त्रिपुरा व नागालँडमध्ये अवस्था फारच वाईट झाली आहे. त्रिपुरात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, तर नागालँडमध्येही हा पक्ष रिंगणातच नव्हता. तिथेही या पक्षाला कुठेच विजय मिळवता आला नाही.
नवी दिल्ली : मेघालयात बहुमताच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसची त्रिपुरा व नागालँडमध्ये अवस्था फारच वाईट झाली आहे. त्रिपुरात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, तर नागालँडमध्येही हा पक्ष रिंगणातच नव्हता. तिथेही या पक्षाला कुठेच विजय मिळवता आला नाही.
नसलेली संघटना, उमेदवारांची वानवा, निवडणुकांसाठी पैसा नाही व केंद्रीय नेतृत्वाचे नसलेले लक्ष याचेच परिणाम काँग्रेसला भोगावे लागले. त्रिपुरामध्ये राहुल गांधी यांनी एकच सभा घेतली. नागालँडमध्ये काँग्रेसला आपले पाच उमेदवार मागे घ्यावे लागले. तिथे पक्षाचे १८ उमेदवारच होते. इथे काँग्रेसने २0१३ साली ४८ उमेदवार उभे करून, १0 जागी विजय मिळवला. काँग्रेसला यंदा जेमतेम दोन टक्केच मते मिळाली.
काँग्रेसचे प्रभारी सी. पी. जोशी यांना तेथील राज्यांचे नेते दोष देत आहेत. जोशी तिथे येत नसत. त्यांनी राहुल गांधी यांनाही येऊ दिले नाही, असा आरोप नागालँड काँग्रेसचे अध्यक्ष केवे थापे थेरी यांनी केला. जोशी यांनी नागालँडमध्येच नव्हे, तर ईशान्येतून काँग्रेस संपवली, अशी टीका त्यांनी केली. नागालँडमध्ये २0१३ साली काँग्रेसने ५६ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ८ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा २४.८९ टक्के मते मिळवणाºया काँग्रेसला यंदा भोपळाही फोडता आला नाही.
आम्ही संपलेलो
नाही : काँग्रेस
त्रिपुरातील काँग्रेसच्या नेत्यांचेही नेमके हेच म्हणणे आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष बिराजीत सिन्हा यांनी मात्र आमचे केंद्रात सत्तेत नसल्याने आमची आतापर्यंतची पारंपरिक मते भाजपाकडे गेली, असे विश्लेषण केले. आमचा राज्यात प्रथमच असा पराभव झाला नसून, १९७७ सालीही आम्ही पराभूत झालो होतो, पण आम्ही पुन्हा १९८८ साली सत्तेत आलो होतो. यावेळी मेघालयात काँग्रेस सरकार स्थापन करेल, असा दावा पक्षाच्या प्रभारी यशोमती ठाकूर यांनी केला आहे.