मणिपूरमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष
By Admin | Published: March 12, 2017 12:53 AM2017-03-12T00:53:21+5:302017-03-12T00:53:21+5:30
मणिपूरमधील सत्ताधारी काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या असल्या तरी त्या पक्षाला तिथे बहुमतापेक्षा ४ जागा कमी मिळाल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने २२ जागा जिंकल्या
इम्फाळ : मणिपूरमधील सत्ताधारी काँग्रेसने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या असल्या तरी त्या पक्षाला तिथे बहुमतापेक्षा ४ जागा कमी मिळाल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने २२ जागा जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेसलाच सरकार स्थापनेसाठी राज्यपाल बोलावण्याची शक्यता आहे. मात्र यापुढे तेथील सरकार अस्थिर राहण्याचीच चिन्हे आहेत. मात्र तिथे सलग चौथ्यांदा काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला या राज्यात ३८ जागांवर विजय मिळाला होता.
अर्थात ईशान्येकडील हे राज्य भाजपाच्या हातात गेले नाही, याचे प्रमुख कारण मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. त्या राज्यात प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केवळ एक सभा घेतली. काँग्रेसचे अन्य नेते तिथे गेलेही नाहीत. अशा स्थितीत इबोबी सिंह यांनी काँग्रेसला सत्तेच्या समीप आणले आहे.
नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टीने प्रत्येकी चार जागा जिंकल्या आहेत. डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस तसेच लोकजनशक्ती पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी किमान चार आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यापैकी नागा पीपल्स फ्रंट व लोकजनशक्ती पार्टी यांची काँग्रेसला मदत मिळण्याची शक्यता नाही, तर तृणमूल, डावे व नॅशनल पीपल्स पार्टी यांचा भाजपाला समर्थन मिळणे अवघड आहे.
लोकजनशक्ती पक्षाने आणि अपक्षाने एकेक जागा जिंकली. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी थोबल मतदारसंघात भाजपाचे एल. बसंता सिंह यांचा १० हजार ४०० मतांनी पराभव केला. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या इरोम शर्मिला यांनी इबोबी सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, त्यांना अवघी ९० मते मिळाली.
समविचारी धर्मनिरपेक्ष आणि प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन आमचा पक्ष सरकार स्थापन करील, असे मणिपूर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष टी. एन. हाओकिप यांनी म्हटले. साठ सदस्यांच्या विधानसभेत कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी ३१ जागा जिंकता आलेल्या नाहीत. आम्ही आधीच समविचारी धर्मनिरपेक्ष व प्रादेशिक पक्षांशी चर्चा करीत आहोत, असे इबोबी सिंह म्हणाले.
नागा पीपल्स फ्रंट आणि भाजपाशी आम्ही कधीही आघाडी करणार नाही, तर आम्ही इतर कोणत्याही पक्षाशी आघाडी करायला तयार आहोत, असे इबोबी म्हणाले. तुमच्या पक्षाला बहुमत मिळाले नाही त्याचे कारण काय, असे विचारता इबोबी सिंह यांनी मोठ्या प्रमाणावर नागा सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँडने अनेक ठिकाणी एनपीएफ आणि भाजपासाठी मतदान केंद्रे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप केला. भाजपाच्या बाजूने मते वळवण्यासाठी पैशांची शक्तीही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मणिपूरमध्ये लोजपाचा भाजपाला पाठिंबा
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचा एक उमेदवार मणिपूरमध्ये निवडून आला आहे. आपला पक्ष भाजपाला पाठिंबा देईल, असे पासवान म्हणाले. लोजपाचे उमेदवार कराम श्याम यांनी लांगथाबल मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ओ जॉय सिंह यांचा २,३३१ मतांनी पराभव केला.