'राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसकडून गुजरातमध्ये हिंसाचार'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:17 PM2018-10-09T21:17:29+5:302018-10-09T21:20:58+5:30
गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.
नवी दिल्ली- गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. काँग्रेसच्या याच आरोपाला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार भाजपानं केला आहे. तसेच गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचा हात आहे. राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसनं उत्तर भारतीयांवर हल्ले चढवले, असा आरोप भाजपानं केला आहे.
If Rahul Gandhi is actually worried for Gujarat, Bihar&India then he must immediately expel Alpesh Thakor from the party. This is what BJP demands from Rahul Gandhi&Congress Party: Sambit Patra, BJP on allegations that Thakor fanned violence against UP&Bihar migrants in #Gujaratpic.twitter.com/4OrZ3QC4w6
— ANI (@ANI) October 9, 2018
काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी लोकांना भडकावण्याचं काम केलं आहे. गुजरातमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारामागे काँग्रेसचा हात आहे. तसेच या प्रकाराला अल्पेश ठाकोर कारणीभूत आहे. काँग्रेस पक्ष शहरातल्या नक्षल्यांना आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोपही भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. मंदसोरमध्ये काँग्रेस आमदारानं लोकांना भडकावण्यासह परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकाराच्या मागे राहुल गांधींना लाँच करण्याचा उद्देश आहे.
काँग्रेसच्या तीन 'सी'चा भांडाफोड झाला आहे. ज्यात अफरातफरी, षड्यंत्र, धोका या तीन गोष्टींचा समावेश आहे. गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यानंतर 20 हजारांहून जास्त प्रवासी आपापल्या राज्यांत परतले आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सुरक्षा प्रदान करणार असल्याचं सांगत त्यांना परत गुजरातमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे.
काय आहे प्रकरण ?
गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.