'महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच', दिग्विजय सिंह यांचा सरसंघचालकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 09:55 IST2021-09-10T09:54:27+5:302021-09-10T09:55:23+5:30
महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत नाही असं विधान तालिबानी प्रवक्त्यानं केलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

'महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच', दिग्विजय सिंह यांचा सरसंघचालकांवर निशाणा
अफगाणिस्तानात तालिबानी शासन आल्यानंतर भारतात या मुद्द्यावरुन वादविवाद सुरूच आहेत. तालिबान्यांनी आपल्या अंतरिम सरकारची घोषणा देखील केली. यात एकूण ३३ जणांचं मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. पण यात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत नाही असं विधान तालिबानी प्रवक्त्यानं केलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
दिग्विजय सिंह यांनी आज सकाळी एक ट्विट केलं असून यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची थेट तालिबानसोबत तुलना केली आहे. यासाठी त्यांनी समाजात महिलांना प्रशासकीय कामांत सहभागी कर न देण्याच्या भूमिकेचं उदाहरण दिलं आहे. "महिला मंत्रिपद देण्याच्या लायकीच्या नाहीत असं तालिबानी म्हणतात. तर महिलांनी घरातच राहून संसार सांभाळायला हवं असं मोहन भागवत म्हणतात. मग दोघांची विचारधारा एकच नाही का?", असं दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.
तालीबान- महिलाएँ मंत्री बनाए जाने लायक़ नहीं हैं।
— digvijaya singh (@digvijaya_28) September 10, 2021
मोहन भागवत- महिलाओं को घर पर ही रह कर गृहस्थी सम्भालना चाहिए।
क्या विचारों में समानता है? https://t.co/BAm6xnkS1M
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. २०१३ साली मोहन भागवत यांनी महिलांबाबत एक विधान केलं होतं. त्यावेळी भागवतांच्या या विधानाची जोरदार चर्चा देखील झाली होती. "लग्न म्हणजे पती-पत्नी यांच्यातील एक करार आहे. यात पत्नी घराचा सांभाळ आणि इतर गोष्टींची काळजी घेते. तर पती कामकाज व महिला सुरक्षेची जबाबदारी सांभाळतो", असं मोहन भागवत म्हणाले होते.
दिग्विजय सिंग यांनी याआधी अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारबाबत भारत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन देखील केलं होतं. "दहशतवादी संघटनेचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इनाम घोषीत झालेल्या दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या तालिबानी सरकारला भारत मान्यता देणार का? हे आता मोदी, शहांनी स्पष्ट करायला हवं", असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं सरकारमध्ये महिलांना स्थान देण्यात येईल असं म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात नुकतंच जाहीर झालेल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही. याबाबत विचारण्यात आलं असता महिला मंत्री बनू शकत नाहीत. त्या फक्त मुलांना जन्म देण्यासाठी आहेत, असं विधान तालिबानी प्रवक्त्यानं केलं होतं.