Coronavirus : कोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी केंद्रानं चाचण्या कमी केल्या; पी. चिदंबरम यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 09:29 AM2021-05-06T09:29:43+5:302021-05-06T09:34:46+5:30
कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधकांचा केंद्रावर निशाणा. कोरोनाच्या चाचण्या कमी केल्यामुळे संख्या कमी येत असल्याचा चिदंबरम यांचा दावा
सध्या देशात मोठ्या प्रमाणात दररोज कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून विरोधक सातत्यानं केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत केंद्रानं कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी चाचण्या कमी केल्या असल्याचा दावा माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केली आहे. लोकांची फसवणूक करण्याऐवजी सरकारनं कोरोनाच्या चाचण्य़ा वाढवल्या पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पी. चिदंबरम यांनी ट्विटरवर एक चार्ट शेअर केला आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी १८-१९ लाख चाचण्या होत असल्याच म्हटलं आहे. तसंच गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती संख्या १५ लाखांवर आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
"ही बिलकुल हैराण करणारी बाब नाही. हा संसर्ग कमी होण्याचा पुरावाही नाही. कमी चाचण्या करा, कोरोना बाधितांची संख्या कमी येईल. जर तुम्ही चाचण्याच केल्या नाही तर कोरोनाचं कोणतंही प्रकरणच समोर येणार नाही. सरकारनं लोकांची फसवणूक करून नये. त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे," असं चिदंबरम म्हणाले.
The table shows that the number tested every day has declined and the number of infections has declined too! pic.twitter.com/yiszwHkbnf
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 5, 2021
तिसरी लाट अटळ
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येणं अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी केला आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटा येणार असून त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज झालं पाहिजे.
हेही वाचा - कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी, स्पष्ट धोरण नाही; कपिल सिब्बल यांचा निशाणा
"देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी लसी तयार करणेही आवश्यक आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे संसर्गात तसेच रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचा देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनाचे निकष पाळून कमी वेळेत औषधे, लसी तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत," असंही ते म्हणाले.