सूडबुद्धीने उत्तर प्रदेश पोलीस काम करत आहेत, प्रियंका गांधींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 04:55 PM2019-12-30T16:55:14+5:302019-12-30T17:22:15+5:30
'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे.'
लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसाचार उसळला होता, त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल प्रियंका गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूडबुद्धीच्या आधारे उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना धमकी दिली जात आहे. 77 वर्षीय माजी पोलीस अधिकारी दारापुरी यांच्या त्यांच्या घरातून अटक केली. त्यांचे नाव 48 लोकांच्या यादीत आहे. आम्ही राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. भगवे वस्त्र परिधान करतात, ते आम्हाला शांती आणि करूणा शिकवतात. पण, सूडबुद्धीने वागायचे शिकवत नाहीत, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी योदी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.
प्रियंका गांधी म्हणाल्या, "आज सकाळी राज्यपालांकडे एक चिठ्ठी पाठविण्यात आली आहे. त्यासंदर्भात पत्रकार परिषद बोलावली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून पोलीस आणि प्रशासनाद्वारे अनेक ठिकाणी अराजकता पसरवली जात आहे. कायद्याच्या आधारे कोणतीही पाऊले सरकारकडून उचलली जात नाहीत.उत्तर प्रदेशात 5500 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 1100 लोकांना अटक केली आहे."
कांग्रेस प्रतिनिधिमंडल ने आज राज्यपाल से मुलाकात की और प्रदेश में सीएए और एनआरसी के खिलाफ हुए प्रदर्शनों के दौरान पुलिस की बर्बरता की न्यायिक जांच कराने की मांग को लेकर ज्ञापन सौंपा। pic.twitter.com/WUBOxcsCYA
— UP Congress (@INCUttarPradesh) December 30, 2019
याचबरोबर, मी बिजनौरमध्ये गेले होते. त्याठिकाणी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. एक मुलगा कॉफी मशीन चालवत होता. तो घराबाहेर फक्त दूध आणण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह दिला नाही. कुटुंबीयांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच, यूपीएससीची तयारी करत होता, त्या सुलेमान बद्दलही प्रियंका गांधी यांनी भाष्य केले.
दरम्यान, गेल्या शनिवारी 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅली आटोपल्यानंतर प्रियंका गांधी माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाल्या. मात्र, लखनऊ पोलिसांनी 1090 चौकात प्रियंका गांधी यांचा ताफा रोखला. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी चालत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. यानंतर पोलिसांनी माघार घेत प्रियंका गांधी यांना एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास परवानगी दिली. मात्र, प्रियंका गांधी या आपल्या ताफ्यातून न जाता स्कूटीवरुन एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचल्या होत्या.
पोलिसाने माझा गळा दाबला - प्रियांका गांधी
नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी आयपीएस एस. आर. दारापुरी यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेशातील एका महिला पोलिसाने आपला गळा दाबला, तसेच आपणास धक्का देऊन खाली पाडले, असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला. प्रियांका गांधी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले की, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांना विनाकारण अटक केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी जात होते. काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून मी बाहेर पडले. लोहिया चौकात आम्हाला पोलिसांनी अडवले. मी गाडीतून उतरून पायी चालू लागले, तेव्हा मला पोलिसांनी घेरले. एका महिला पोलिसाने माझा गळा दाबला. मला धक्का दिला. त्यामुळे मी पडले. पुढे गेल्यानंतर मला पुन्हा पकडण्यात आले. मी एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून जाऊ लागले, तेव्हा त्यालाही पाडण्यात आले.