उन्नावमध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार, प्रियंका गांधींचा योगी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 07:45 PM2019-11-17T19:45:21+5:302019-11-17T19:46:04+5:30
शनिवारी संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये पोलीस शेतकऱ्यांना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडीओसोबत प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आता गोरखपूरमधील शेतकऱ्यांविषयी मोठ-मोठ्या गोष्टी करत आहे. मात्र, त्यांच्या पोलिसांचे कृत्य पाहा. उन्नावमध्ये एक शेतकरी पोलिसांच्या लाठीने अर्धमेला झाला आहे, तरी सुद्धा त्याला पोलीस मारहाण करीत आहेत. डोळे लाजेने खाली गेले पाहिजेत. जे आपल्यासाठी अन्न उपलब्ध करून देतात, त्यांच्यासोबतच अशी निर्दयता?"
उप्र के CM क्या केवल किसानों पर लच्छेदार भाषण ही दे पाते हैं? क्योंकि भाजपा सरकार में किसानों का अपमान ही होता रहता है। उन्नाव में जमीन का मुआवज़ा माँग रहे किसानों की पुलिस ने बेरहमी से पिटाई कर दी। महिला किसानों को भी पीटा गया। किसानों की जमीन ली है तो मुआवजा तो देना ही होगा। pic.twitter.com/7vtvejf68z
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 16, 2019
याआधी प्रियंका गांधी यांनी शनिवारी ट्विट करून या घटनेचा उल्लेख केला होता. यावेळीही प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फक्त शेतकऱ्यांवर भाषण करतात, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. भाजपा सरकारमध्ये शेतकऱ्यांचा अपमान होत आहे. उन्नावमध्ये जमिनीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे, तर त्यांना नुकसान भरपाई द्यायलाच हवी, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
शनिवारी संतप्त शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलक शेतकऱ्यांची मागणी होती की, जमिनीचा दर हा सध्याच्या जमिनीच्या भावानुसार द्यावा. दरम्यान, जिल्हाधिकारी देवेंद्र पांडेय यांनी याप्रकरणी सांगितले होते की, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. प्रशासनाकडे शेतकऱ्यांची कोणतीही थकबाकी शिल्लक नाही.