देश जन्मल्यानंतर जन्माला आलेले मोदी राष्ट्रपिता कसे?; शशी थरुर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 09:25 AM2019-10-04T09:25:56+5:302019-10-04T09:34:50+5:30
'राष्ट्रपिता'वरुन थरुर यांचा मोदींना टोला
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. त्यावरुन बराच वादंग माजला. यावरुन आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मोदींवर निशाणा साधला. देश जन्माला आल्यानंतर जन्मलेले मोदी राष्ट्रपिता कसे होऊ शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यांनी मोदींचा उल्लेख 'फादर ऑफ इंडिया' असा केला. त्यावर शशी थरुर यांनी भाष्य केलं. 'भारताचा जन्म १९४७ मध्ये झाला आणि मोदींचं जन्मवर्ष १९४९ किंवा १९५० आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना बहुधा याची कल्पना नसावी. मुलाच्या जन्मानंतर वडिलांचा जन्म होणं अवघड आहे,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी जोरदार टोला लगावला आहे.
#WATCH Indore: Congress' Shashi Tharoor reacts on US Pres calling PM Modi 'Father of the nation'.Says "...Maybe Mr Trump doesn't know independent India was born in 1947&Modi ji's birth date is either 1949 or '50. It'll be difficult if the father is born after the child..." (3.10) pic.twitter.com/n1qdrkcCfK
— ANI (@ANI) October 3, 2019
काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं थरुर यांनी स्वागत केलं. 'काश्मीर प्रश्नावर आपल्याला मध्यस्थाची गरज नाही. पाकिस्तानसोबत संवाद साधण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र ते एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात बॉम्ब घेत असतील, तर मग बातचीत होणं अवघड आहे. पाकिस्ताननं दहशतवादी तळ बंद केल्यास संवाद शक्य आहे,' असं थरुर म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मोदी सरकारनं यावर ठाम भूमिका घेत हा भारत, पाकिस्तान यांच्यातील वाद असून त्यात तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. त्यावर भाष्य करताना काँग्रेस आणि भाजपाची भूमिका सारखीच असल्याचं थरुर म्हणाले. काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही. पाकिस्तानसोबत संवाद साधला जाऊ शकतो. मात्र ते दहशतवाद्यांना थारा देत असल्यानं आम्ही त्यांच्याशी असलेला संवाद बंद केला आहे, असं थरुर म्हणाले.