साध्वी प्रज्ञा क्रिकेट खेळल्या, काँग्रेस नेता म्हणाला..."हे तर आठवे आश्चर्य, चमत्काराचा शोध व्हायला हवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:44 PM2021-12-25T19:44:55+5:302021-12-25T19:46:15+5:30
वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विरोधकांनी साध्वी प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधला आहे.
भोपाळ-
वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विरोधकांनी साध्वी प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी केलेलं कोणतंही विधान नव्हे, तर त्यांची कृती चर्चेचं केंद्रस्थान बनलं आहे. भोपाळच्या शक्तीनगर स्पोर्ट्स ग्राऊंडमध्ये साध्वी प्रज्ञा यांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात साध्वी प्रज्ञा यांनी 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत जोरदार फलंदाजी करताना दिसत आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्या याच क्रिकेट खेळण्यावर काँग्रेस नेत्यांनी निशाणा साधला आहे.
साध्वी प्रज्ञा सहसा व्हीलचेअरवर दिसून येतात. पण यावेळी थेट क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करताना पाहायला मिळाल्यानं विरोधकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. काँग्रेस नेते नरेंद्र सलुजा यांनी साध्वी प्रज्ञा यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. "व्हीलचेअरवर दिसणाऱ्या साध्वी प्रज्ञा आपल्या आजारपणाचं कारण देऊन न्यायालयात हजर राहत नाहीत. पण जेव्हा क्रिकेट, फुटबॉल, वॉलीबॉल किंवा समारंभात नृत्य करताना पाहायला मिळतात तेव्हा खूप आनंद होतो. असं वाटतं की हे तर आठवं आश्चर्य आहे. या चमत्काराचा जागतिक डॉक्टरांनी शोध घेतला पाहिजे", असं ट्विट करत नरेंद्र सलुजा यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना टोला लगावला आहे.
व्हील चेयर पर ज़्यादातर समय नज़र आने वाली , बीमारी के कारण न्यायालय से राहत पाने वाली साध्वी जी जब क्रिकेट खेलते , फ़ुट्बॉल खेलते , समारोह में नृत्य करते दिखती है तो ख़ुशी होती है और ऐसा लगता है कि यह कोई आठवाँ अजूबा है , इस चमत्कार पर तो विश्व के डॉक्टरो को शोध करना चाहिये… pic.twitter.com/rUpPDaxi2g
— Narendra Saluja (@NarendraSaluja) December 25, 2021
साध्वी प्रज्ञा यांनी एका क्रिकेट ग्राऊंडवरील स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी त्या बास्केटबॉल आणि वॉलीबॉल खेळत असतानाचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यासोबतच एका निवडणूक प्रचारावेळी त्या सिंधी समाजाच्या कार्यक्रमात भजनात नृत्यू करतानाही पाहायला मिळाल्या होत्या.