कॉँग्रेसवाल्यांचा राफेलबद्दलही खोटारडेपणाच, नरेंद्र मोदी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:33 AM2019-05-05T06:33:31+5:302019-05-05T06:33:52+5:30
कॉँग्रेसवाल्यांना माहिती आहे की, नरेंंद्र मोदीला हरवायचे असेल, तर काहीही करून खाली पाडले पाहिजे. त्यामुळे ते दररोज माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत.
प्रतापगढ - कॉँग्रेसवाल्यांना माहिती आहे की, नरेंंद्र मोदीला हरवायचे असेल, तर काहीही करून खाली पाडले पाहिजे. त्यामुळे ते दररोज माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत. राफेलबद्दलही त्यांनी खोटारडेपणा केला. ते रोज चिखलफेक करीत आहेत. माझी प्रतिमा मलिन करणे हे कॉँग्रेसचे एकमेव काम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.
उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ मध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेताना शायरी ऐकवली. ‘ना मैं गिरा ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे’ असा शेर नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान ऐकवला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा या लोकांना माझे काही वाईट करता आले नाही, तर ते आता माझी प्रतिमा खराब करत आहेत. जो पक्ष निवडणुकीपूर्वी स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार समजत होता, तो आता स्वत:ला मते कापलेला पक्ष मानू लागला आहे. कॉँग्रेसच्या पतनाचे हे जिवंत उदाहरण आहे.
अन्य पक्षांमधील घराणेशाहीवर टीका करताना मोदी म्हणाले की, लक्षात घ्या नरेंद्र मोदी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाही, कोणत्याही राजघराण्यातही पैदा झालेला नाही. देशाच्या धुळीमधून तो जन्माला आला आहे. गेली ५० वर्षे न थकता, ना थांबता तो जगत आलेला आहे. या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यासाठी त्याने तपश्चर्या केली आहे. ५ किंवा ५० मुलाखती
देऊन नरेंद्र मोदीची गेल्या ५०
वर्षांची प्रतिमा तुम्ही बिघडवू शकत
नाही.
राजीव गांधी यांच्यावर टीका
राफेलवरून आपली प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्नांचा आरोप कॉँग्रेसवर करून मोदी यांनी राहुल गांधी यांचेपिता दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केली. ‘मिस्टर क्लीन’ असा त्यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची जीवनयात्रा ‘भ्रष्टाचारी नम्बर वन’च्या रूपातच संपली.
या सभेत केलेल्या भाषणात नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांचा उल्लेख तिरकसपणे नामदार असा केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी मोदीच्या तेजोवलयाला आपण घाबरत असल्याचे ते सांगत असत. आता मोदी करीत असलेले कष्ट, त्यांचा प्रामाणिकपणा आणि देशभक्तीवर जोपर्यंत डाग
लागत नाही, तोपर्यंत आपण जिंकू शकत नाही, असे ते म्हणू लागले आहेत.