"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:50 PM2024-09-23T17:50:26+5:302024-09-23T18:00:25+5:30
Haryana Assembly Elections 2024 : वडील आणि मुलामध्ये वाद सुरू आहे, असे म्हणत अमित शहा यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर निशाणा साधला.
Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तसं राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. यातच काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत आहे. यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. तसेच, काँग्रेसमध्ये लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे. वडील आणि मुलामध्ये वाद सुरू आहे, असे अमित शाह म्हणाले.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह सोमवारी यमुनानगर येथे दाखल झाले. यावेळी जिथे 'एक अनार और सौ बीमार' अशी परिस्थिती आहे, तिथे ते निवडणूक जिंकणार का? असा सवाल करत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, मोठा हुड्डा आणि छोटा हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे. वडील आणि मुलामध्ये वाद सुरू आहे, असे म्हणत अमित शहा यांनी काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेस नेत्या कुमारी सैलजा यांच्या नाराजीच्या वृत्तावर अमित शाह म्हणाले की, त्या रागात उत्तराखंडला गेल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत तिकीट वाटपात हा भेदभाव आणि सन्मान मिळत नसल्याने कुमारी सैलजा नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पुढे अमित शाह म्हणाले, आधी मनमोहन सिंग होते, त्यांना घुसखोर शोधायला १५ दिवस लागत होते, कारण ते काँग्रेसचे होते. आता मोदीजी आहेत, आज कोणी घुसखोरी केली तर दुसऱ्या दिवशी घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करतात.
अमित शाह यांनी निवडणूक रॅलीत आश्वासन दिले की, जे अग्निवीर येतील त्यांना भारत सरकार आणि हरियाणा सरकार पेन्शनसह नोकऱ्या देईल. तसेच, हरियाणा ही वीरभूमी आहे. सैन्यातील प्रत्येक दहावा सैनिक हरियाणातून येतो. हे हरियाणा म्हणजे खेळाडू आणि सैनिकांचे राज्य आहे. ४० वर्षांपासून वन रँक, वन पेन्शनची मागणी हरियाणा करत होता. देशभरातील आमचे लष्करी जवान ही मागणी करत होते. ती मागणी मोदींनी पूर्ण केली आणि लष्कराच्या जवानांच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले, असे अमित शाह म्हणाले.
दरम्यान, हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेसकडून तिकीट वाटप आणि निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील मतभेद अधिकच वाढले आहे. तिकीट वाटपादरम्यान माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या समर्थकांना काँग्रेसमध्ये ७२ तिकिटे मिळाली आहेत, तर कुमारी सेलजा यांना चार विद्यमान आमदारांसह सुमारे १० तिकिटांवर समाधान मानावे लागले आहे.
अशा स्थितीत दोन्ही गटांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांना केवळ दोनच तिकिटे मिळाली आहेत. तर हायकमांडच्या पसंतीनुसार चार ते सहा तिकिटे देण्यात आली आहेत. तिकीट वाटपात हा भेदभाव आणि सन्मान मिळत नसल्याने कुमारी सैलजा नाराज आहेत.