भाजपविरुद्ध एकत्र येण्याचे ममतांचे आवाहन काँग्रेस, डाव्यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 05:07 AM2019-06-28T05:07:02+5:302019-06-28T05:07:38+5:30

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे.

Congress & Left rejects Mamata's appeals | भाजपविरुद्ध एकत्र येण्याचे ममतांचे आवाहन काँग्रेस, डाव्यांनी फेटाळले

भाजपविरुद्ध एकत्र येण्याचे ममतांचे आवाहन काँग्रेस, डाव्यांनी फेटाळले

Next

कोलकाता/नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर एका महिन्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे.

मात्र दोन्ही डाव्या पक्षांनी ममता बॅनर्जी यांचे आवाहन फेटाळून लावले असून, काँग्रेसनेही ममता बॅनर्जी अन्य पक्षांच्या सहकार्यासाठी किती गंभीर आहेत, अशी शंकाच व्यक्त केली आहे. भाजपशी संघर्ष कसा करायचा, हे आम्हाला ममता बॅनर्जी यांच्याकडून शिकण्याची गरज नाही, असे डाव्या पक्षांनी म्हटले आहे, तर ममता बॅनर्जी या भाजपशी लढण्याबाबत खरोखर गंभीर आहेत का, अशी शंका काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी व्यक्त केली.

विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना ममता यांनी हे आवाहन केले होते. देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रभाव वाढण्यास ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुजन चक्रवर्ती यांनीही असेच म्हटले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष व काँग्रेस एकत्र येणे शक्य नाही, हे स्पष्ट झाले आहे.

ममता बॅनर्जी घाबरल्या : भाजप
ममता बॅनर्जी डावे व काँग्रेस यांना आपल्यासोबत येण्यास सांगतात, यावरून त्यांना एकट्याने लढण्याची आणि विजयी होण्याची भीती वाटू लागली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे.

एकट्या तृणमूलला सामना करणे अवघड

पश्चिम बंगालमध्ये दोन वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत; पण आताच झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपने तब्बल १८ जागांवर विजय मिळाल्यामुळे त्या पक्षाने राज्यात आपले पाय भक्कम रोवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशा स्थितीत एकट्या तृणमूल काँग्रेसला भाजपशी सामना करणे शक्य होणार नाही, अशी भीती ममता बॅनर्जी यांना वाटत असावी. कदाचित मतविभागणीचा फायदा भाजपला होऊ नये, या इच्छेमुळे त्यांनी डावे पक्ष व काँग्रेसला सहकार्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले असावे.

Web Title: Congress & Left rejects Mamata's appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.