भाजपेतर पक्ष गुजरातेत आपसोबत जाण्यास अनुत्सुक; उत्तर प्रदेशमध्ये सपा जातोय राष्ट्रीय लोकदलाच्याजवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:32 AM2021-08-30T08:32:35+5:302021-08-30T08:33:44+5:30
समाजवादी पक्ष महत्त्वाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्यास उत्सुक नाही.
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणूक भाजपेतर पक्ष आम आदमी पक्षासोबत (आप) राहून लढवण्याची शक्यता नाही. उत्तराखंड, पंजाब आणि कदाचित गोव्यात भाजपशी लढण्यासाठी काँग्रेस हा मुख्य पक्ष आहे, तर समाजवादी पक्ष महत्त्वाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्यास उत्सुक नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भाजपेतर पक्षांचा एक गट असावा आणि त्याने नियमितपणे बैठक घेऊन भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारविरोधात योजना तयार करावी, अशी इच्छा आहे. परंतु, त्यांच्या या सूचनेवर पुढे काही प्रगती झालेली नाही. चार मुख्यमंत्र्यांसह अशा पक्षांच्या १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत बोलावलेल्या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
ही बैठक भाजपला राष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह पर्याय देता यावा, या उद्देशाने होती. परंतु, भाजपेतर आघाडी आकार घेईल अशी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही, यामुळे वेगळे धोरण अवलंबणे भाग पडले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. कारण, भाजपच्या मतांमध्ये फूट पडणार हे त्यांना माहीत आहे. सोनिया गांधी यांनी विरोधकांच्या घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर जारी केल्या गेलेल्या संयुक्त निवेदनात आपचा सहभाग नव्हता.