काँग्रेस मंत्र्यांनी घेतली सोनिया व राहुल गांधींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 04:13 AM2020-01-01T04:13:56+5:302020-01-01T04:14:38+5:30
काँग्रेसचा जनाधार वाढविण्याचे मंत्र्यांना निर्देश; किमान समान कार्यक्रमानुसार राहणार वाटचाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासोबत जनतेचे प्रश्न सोडवा, असा सल्ला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नवनियुक्त मंत्र्यांना दिला.
मंत्रिमंडळात सोमवारी समाविष्ट झाल्यानंतर काँग्रेसचे सर्व दहाही मंत्र्यांनी रात्रीच दिल्ली गाठली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, असलम शेख व वर्षा गायकवाड यांनी तुघलक रोडवरील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी राहुल गांधी यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच काँग्रेसचा जनाधार पुन्हा महाराष्ट्रात मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे.
किमान समान कार्यक्रमानुसार तसेच काँग्रेसचे धोरणे राबविण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी काही जिल्ह्यांची जबाबदारी घ्यावी, अशी सूचना राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सर्वच मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेतली. यानंतर सर्व मंत्र्यांनी अ. भा. काँग्रेस समितीच्या मुख्यालयात येऊन संघटनेतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे प्रभारी मल्लिाकार्जुन खरगे, महासचिव के. सी. वेणुगोपल, सरचिटणीस मुकुल वासनिक यांची या मंत्र्यांनी भेट घेतली.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य -थोरात
या भेटीनंतर काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसची यापुढील वाटचाल ही किमान समान कार्यक्रमानुसार राहणार आहे. यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविले जाणार आहे. याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना विश्वास दिला आहे.
विरोधकांकडे मुद्दे नाहीत -चव्हाण
महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या विकासासाठी निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते याकुब मेमनच्या फाशीचे मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला.