बंगळुरूतल्या काँग्रेस आमदाराकडे 120 कोटींची अघोषित संपत्ती
By admin | Published: February 13, 2017 10:58 AM2017-02-13T10:58:53+5:302017-02-13T10:58:53+5:30
कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदाराकडे 120 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदाराकडे 120 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळून आली आहे. गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाकडून आमदाराची कार्यालये आणि निवासस्थानं, अशा विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत होते. या छाप्यादरम्यान 1.10 कोटी रुपयांची रोकड, 10 किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे.
काँग्रेस आमदार एम. टी. बी. नागराज यांची अघोषित संपत्ती असल्याचा सुगावा प्राप्तिकर विभागाला लागल्यामुळे आमदारांच्या विविध कार्यालये आणि निवासस्थानांवर त्यांनी छापे टाकले आहेत. या काँग्रेस आमदारावर कर बुडवल्याचाही आरोप आहे. नागराज यांनी कर बुडवल्याप्रकरणी लावण्यात आलेल्या चौकशीवरून हे छापे टाकण्यात आले असून, छाप्यात 120 कोटींहून अधिक मालमत्तेचा खुलासा झाला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं दिली आहे.
आमदाराने व्यावसायिक संपत्ती, रुग्णालयं, घर, बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने कर्ज घेऊन एवढी मोठी संपत्ती जमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या छाप्यात आमदार आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 560 एकर जमिनीची 3500हून अधिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आमदाराला जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या 70 कोटी रुपयांचीही चौकशी सुरू आहे. तत्पूर्वी 23 जानेवारीला प्राप्तिकर विभागाने कर्नाटकचे एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 162 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता आढळून आली होती. प्राप्तिकर विभागाच्या या छाप्यात 41 लाखांच्या रोकडसह सोने, चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.