काँग्रेसच्या फुटीर आमदाराला भाजपचे राज्यसभा तिकीट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 03:41 AM2017-07-28T03:41:01+5:302017-07-28T03:41:05+5:30
काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते शंकरसिंह वाघेला यांच्या तीन समर्थक आमदारांनी गुरुवारी पक्ष व आमदारकी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला.
नवी दिल्ली : काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते शंकरसिंह वाघेला यांच्या तीन समर्थक आमदारांनी गुरुवारी पक्ष व आमदारकी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे प्रमुख प्रतोद बलवंतसिंह रजपूत यांचा त्यात समावेश असून, त्यांनी पक्ष सोडताच, ते भाजपातर्फे राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.
येत्या ८ आॅगस्ट रोजी गुजरातमधून राज्यसभेवर तिघांना निवडून पाठवण्यात येणार असून, त्यासाठी भाजपाने याआधीच दोन जागांसाठी भाजपाने पक्षाध्यक्ष अमित शहा आणि माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. तिसºया जागेसाठी भाजपा उमेदवार देणार नाही आणि त्यामुळे भाजपाचे हे दोन्ही नेते आणि काँग्रेसचे अहमद पटेल सहज निवडून येतील, असे चित्र होते. पटेल यांनी आपला अर्जही भरला आहे.
पण तिसºया जागेसाठी भाजपाने आजच पक्षात आलेल्या बलवंतसिंह रजपूत यांना उमेदवारी दिल्याचे वृत्त आहे. याआधी अहमद पटेल यांच्याविरोधात शंकरसिंह वाघेला यांना निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत होते. आपले दोन उमेदवार निवडून आणल्यावरही भाजपाकडे काही मते शिल्लक राहतात. काँग्रेसची काही मते फोडून आणि आपली शिल्लक मते देऊ न आपला तिसरा उमेदवारही निवडून आणता येईल, असे भाजपाचे गणित आहे. गुजरात विधानसभेची सदस्यसंख्या १८२ असून, त्यापैकी तिघांनी आज राजीनामे दिले. त्यामुळे ती संख्या १७९ वर आली. प्रत्येक उमेदवाराला राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी जितक्या मतांची गरज आहे, ते पाहता भाजपाचे दोन उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून येतील. शिवाय भाजपाची काही मते शिल्लक राहतील. ती शिल्लक मते व काँग्रेसची फुटीर मते याआधारे आपल्या तिसºया उमेदवाराला निवडून आणता येईल आणि अहमद पटेल पराभूत होतील, असे भाजपाला वाटत आहे. मात्र राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ११ काँग्रेस मते फुटली, हे गृहित धरले तरी काँग्रेसकडे आता ४६ मते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पटेल यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आम्ही आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्षांकडे दिला आहे, असे तिघांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. हे तिघेही भाजपाच्या मुख्यालयात आले, तेव्हा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा सत्कार केला आणि पक्षात आल्याबद्दल आभार मानले.