भाजपविरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसच आवश्यक; कपिल सिब्बल यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:37 AM2023-04-10T06:37:57+5:302023-04-10T06:38:33+5:30

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे

Congress must be at the center of anti BJP alliance says Kapil Sibal | भाजपविरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसच आवश्यक; कपिल सिब्बल यांचे मत

भाजपविरोधी आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसच आवश्यक; कपिल सिब्बल यांचे मत

googlenewsNext

नवी दिल्ली :

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपशी दोन हात करणाऱ्या कोणत्याही आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेस असणे आवश्यक आहे, असे राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी रविवारी म्हटले. 

केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना सर्वांत आधी एक समान व्यासपीठ शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. हे सामायिक व्यासपीठ आपण नव्याने स्थापन केलेला ‘इन्साफ’ हा मंचही असू शकतो, असे ते म्हणाले.

विरोधी आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्द्याचे उत्तर या टप्प्यावर देण्याची गरज नाही, असे सांगताना त्यांनी २००४ चे उदाहरणही दिले. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकार सत्तेतून बाहेर फेकले गेले होते. तेव्हाही पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित नव्हता, असे ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या कोणत्याही युतीत काँग्रेस केंद्रस्थानी व आघाडीवर असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

सिब्बल म्हणाले...
- आपल्याला राहुल गांधींना एखाद्या व्यक्तीबद्दल एक विचार व्यक्त करण्यास आणि शरद पवारांना त्यांचा दृष्टिकोन ठेवण्याची परवानगी द्यायला हवी. हे मतभेदाचे उदाहरण नसावे.
- विरोधकांची एकजूट तेव्हाच होईल जेव्हा आमचे व्यापक एकमत असेल. 
- सरकारच्या हुकुमांमुळे देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्याय होत आहेत. त्यामुळे अन्यायाविरुद्धचा लढा उभारण्यासाठी एक समान व्यासपीठ हवे.
- जोपर्यंत विरोधी एकजुटीचा प्रश्न आहे, तर हे पहिले पाऊल आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांसाठी अधिक मोकळेपणाची भावना देण्याची गरज आहे.
- विरोधी पक्षांसाठी किमान समान कार्यक्रम हे कठीण काम आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच याचा निर्णय घेतला जाईल.
- भाजपमध्ये दाखल झालेल्यांविरोधात सुरू असलेली चौकशी का थांबवली, असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना केला. सिब्बल म्हणाले, ‘भारताचा नकाशा दोन भागात का विभागला गेला आहे, जिथे भाजपशासित राज्ये आहेत तिथे सीबीआयला प्रवेश नाही, तर विरोधी शासित राज्यांमध्ये त्यांना पूर्ण प्रवेश आहे.’

मुद्दे संकुचित केले की मतभेद होतात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अदानी समूहाला पाठिंबा देणाऱ्या विधानाने विरोधी ऐक्याला धक्का बसला आहे का, असे विचारले असता, सिब्बल म्हणाले की, ‘जर तुम्ही मुद्दे संकुचित केले तर राजकीय पक्षांमध्ये मतभेद होतील. तुमच्याकडे एक असा सहयोगी मंच आहे जो मुद्द्यांना संकुचित करत नाही, तर सहमती होण्याची शक्यता अधिक असेल.’

भाजप सोयीचे राजकारण करते
तेलंगणामधील घराणेशाहीच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रत्युत्तर देताना, सिब्बल यांनी भाजप ‘सोयीचं राजकारण’ करत असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हातात हात घालून चालतात, असे ट्वीट सिब्बल यांनी केले आहे. पंजाबमध्ये (अकालींसोबत), आंध्र प्रदेश (जगनसोबत), हरियाणा (चौटाला कुटुंबाशी), जम्मू-काश्मीर (मुफ्ती कुटुंबाशी) आणि महाराष्ट्रात (ठाकरे कुटुंबाशी) भाजपने का हातमिळवणी केली, असा सवाल त्यांनी केला. जेव्हा भाजपने त्यांच्याशी हातमिळवणी केली तेव्हा वंशवाद नव्हता का, यालाच सोयीचे राजकारण म्हणतात, असे सिब्बल यांनी म्हटले.

Web Title: Congress must be at the center of anti BJP alliance says Kapil Sibal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.