काँग्रेसला नेत्यांची नाही, तर व्यवस्थापकांची गरज- एस. एम कृष्णा
By admin | Published: January 29, 2017 03:54 PM2017-01-29T15:54:25+5:302017-01-29T15:54:25+5:30
माजी केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29- माजी केंद्रीय मंत्री एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमध्ये असताना मला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. पक्षाला आता वरिष्ठ नेत्यांची गरज नाही, तर व्यवस्थापक पाहिजेत. काँग्रेसला नेते नव्हे तर परिस्थिती योग्यरीत्या हाताळणारे व्यवस्थापक हवे आहेत. बंगळुरूमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्यावेळी माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षाकडून बाजूला करण्यात आले, त्यावेळी मला अतीव दुःख झाले. मला बाजूला करण्यासाठी माझ्या वयाचं कारण देण्यात आलं, असंही ते म्हणाले आहेत. 84 वर्षांचे कृष्णा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपालपदही त्यांनी भूषवलं आहे. तसेच केंद्रात परराष्ट्र मंत्रिपदासारखी महत्त्वाची खातीही त्यांनी सांभाळली आहेत.
कृष्णा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी असतानाच बंगळुरूचा मोठ्या प्रमाणात विकास केला. बंगळुरू मेट्रो आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची त्यांच्याच कार्यकाळात सुरुवात झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पक्ष सोडत असल्याचं सांगताना मला खूप त्रास आणि दुःख झालं, असंही ते म्हणाले आहे.