'संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, अमित शाह उत्तर द्या...', मल्लिकार्जुन खर्गेंनी सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:51 PM2023-12-13T19:51:47+5:302023-12-13T19:52:59+5:30
Lok Sabha Security Breach: लोकसभेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्यानंतर विरोधक सरकारवर टीका करत आहेत.
Congress On Lok Sabha Security Breach:संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी (13 डिसेंबर) सुरक्षेत गंभीर चूक घडली. लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुण अचानक संसदेत घुसले आणि त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभापतींच्या खुर्चीकडे धाव घेतली, तसेच त्यांनी स्मोक कँडलही फोडला. सुरक्षेतील या मोठ्या त्रुटींवरुन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. तसेच, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन्ही सभागृहात गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तराची मागणी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेत म्हणाले की, लोकसभेत दोघांनी प्रचंड गोंधळ घातला. ही खूप गंभीर बाब आहे. लोकसभा आणि राज्यसभेचा प्रश्न नाही, पण एवढी सुरक्षा असताना ते आत आलेच कसे? यावेळी उपराष्ट्रपती आणि सभापती जगदीप धनखर म्हणाले, मला या प्रकरणाची माहिती मिळताच मी सुरक्षा संचालकांना फोन केला. मी त्यांना या घटनेचे अपडेट विचारले. ही चिंतेची बाब आहे, आम्हाला थोडा वेळ द्या.
आज संसद में जो security breach हुआ वह एक बहुत गंभीर मामला है। हम माँग करते हैं कि गृह मंत्री जी दोनों सदनों में आ कर इस पर Statement दें।
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2023
ये प्रश्न है कि इतने बड़े security महकमें में कैसे दो लोग अंदर आ कर Cannister से गैस वहाँ पर छोड़े हैं ?
आज ही हमने 22 साल पहले हुए संसद… pic.twitter.com/owFkXG90CV
विरोधी खासदारांचा वॉकआऊट
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, लोकसभेत घडलेली अत्यंत असामान्य घटना आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर वक्तव्य देण्यास नकार दिल्याने इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. बावीस वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या दिवशीच सुरक्षेत एवढी मोठी कुचराई, ही अतिशय गंभीर बाब आहे.
काँग्रेस राजकारण करतय
काँग्रेसच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, काँग्रेस या घटनेवर राजकारण करत आहे. घडलेली घटना दुःखद आहे. अशा परिस्थितीत विरोधकांची वृत्ती अशी आहे. देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी आपण सर्वजण एकत्र उभे आहोत, असा संदेश देशाला द्यायला हवा. पण, काँग्रेस या घटनेचेही राजकारण करत आहे. हा देशासाठी चांगला संदेश नाही.