काँग्रेस पक्षाने स्थापन केला संवादगट
By Admin | Published: July 13, 2017 05:01 AM2017-07-13T05:01:11+5:302017-07-13T05:01:11+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी झारखंडचे प्रभारी म्हणून आर. पी. एन. सिंह आणि छत्तीसगढचे प्रभारी म्हणून पी. एल. पुनिया यांच्यावर जबाबदारी सोपविली
शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पक्ष संघटनेत फेरबदल करीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी झारखंडचे प्रभारी म्हणून आर. पी. एन. सिंह आणि छत्तीसगढचे प्रभारी म्हणून पी. एल. पुनिया यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. याशिवाय काँग्रेसने प्रसार माध्यमांसाठी दहा सदस्यांचा एक संवाद गट स्थापन केला आहे.
या संवादगटाची दररोज बैठक घेऊन काँग्रेस पक्षाच्या मीडिया विभागाला सहाय्य करील, असे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.
उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल आणि चीनच्या राजदूतांदरम्यान झालेल्या चर्चेवरून प्रसार माध्यमात पक्षाची जी पंचाईत झाली होती, त्यावर सोनिया आणि राहुल हे नाराज होते. कारण सुरजेवाला यांचे वक्तव्य आणि टिष्ट्वटमुळे या चर्चेने पक्ष नेतृत्वाची द्विधा स्थिती झाली होती. ही चर्चा झाल्याचे मान्य करावे की, नाही? अखेर राहुल यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनीच टिष्ट्वट करून चीनच्या राजदूतांशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तथापि, त्याचवेळी असेही ठरविण्यात आले की, सल्लामसलतीशिवाय कोणतीही घोषणा केली जाणार नाही.
दोन दिवस व्यापक चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी ८ बड्या नेत्यांची मीडियासाठी संवाद रणनीती गट स्थापन केला. यात मल्लिकार्जुन खडगे, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पी. चिदंबरम, मणिशंकर अय्यर,जयराम रमेश, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुष्मिता देव यांचा समावेश करण्यात आला आहे. झारखंडचे नवनियुक्त प्रभारी आर. पी. एन. सिंह यांच्यासोबत उमंग सिंह आणि मैनुल हाक्वे हे सचिव म्हणून काम करतील. छत्तीसगढमध्ये पुनिया यांच्यासोबत कमलेश्वर पटेल आणि अरूण ओरोओ सचिव असतील