राहुल गांधींकडे द्या काँग्रेस पक्षाची धुरा

By admin | Published: November 8, 2016 05:29 AM2016-11-08T05:29:59+5:302016-11-08T05:29:59+5:30

काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपविण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली.

Congress party's axle to Rahul Gandhi | राहुल गांधींकडे द्या काँग्रेस पक्षाची धुरा

राहुल गांधींकडे द्या काँग्रेस पक्षाची धुरा

Next

शीलेश शर्मा , नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपविण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होणार याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र कार्यकारिणीतील ही मागणी हे त्या दिशेने कदाचित पहिले पाऊल, असावे, असे निरीक्षकांना वाटते.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने कार्यकारिणीची बैठक उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य ए. के. अ‍ॅन्थनी यांनी बैठकीत हा विषय काढला व राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, अशी त्यांनी उघडपणे मागणी केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अ‍ॅन्थनी यांच्या म्हणण्यास अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यकारिणीच्या इतरही सर्व सदस्यांनी यास पाठिंबा दिला. सोनिया गांधी यांना भेटून कार्यकारिणीत व्यक्त झालेली ही भावना त्यांना कळविण्याचे ठरले,असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारचा हा घटनाक्रम पूवर्नियोजित असावा व राहुल गांधी यांना पक्षप्रमुखपदी आणण्याचे हे सूतोवाच असावे, असे निरीक्षकांना वाटते.
निरीक्षकांच्या मते काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती पाहता पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पूर्वकल्पना न देता किंवा त्यांच्या संमतीविना या हालचाली एवढ्या उघडपणे होणे शक्य नाही. तरीही पक्षात नेतृत्वबदल नेमका केव्हा होईल व झालाच तरी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिले जाईल की त्यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते हे बदल करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्या लागतील. त्यामुळे बदल कदाचित चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर होतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Congress party's axle to Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.