गो-या रंगामुळे सोनिया गांधी झाल्या काँग्रेस अध्यक्ष - गिरीराज सिंह यांची मुक्ताफळं
By admin | Published: April 1, 2015 12:51 PM2015-04-01T12:51:20+5:302015-04-01T13:02:58+5:30
राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते तर काँग्रेसने त्या मुलीला पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का अशी मुक्ताफळं केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी उधळली आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
हाजीपूर (बिहार), दि. १ - राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते व त्या मुलीचा रंग काळा असता तर काँग्रेसने त्या मुलीला पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का ? अशी मुक्ताफळं केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी उधळली आहेत. केंद्रीय मंत्र्यांने महिलांच्या वर्णावरुन असे बेजबाबदार विधान करणे दुर्दैवी असून गिरीराज सिंह यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
बिहारमधील स्थानिक पत्रकारांनी राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर गिरीराज सिंह यांना प्रश्न विचारला होता. यावर प्रतिक्रिया देताना गिरीराज सिंह यांनी अत्यंत बेजबाबदार विधान केले. राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी विवाह केले असते तर काँग्रेसने तिला स्वीकारले असते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गिरीराज सिंह यांच्या टीकेचा सूर महिलेच्या रंगावर आधारीत होता. सोनिया गांधी या गो-या असल्याने त्यांना काँग्रेसने अध्यक्ष म्हणून स्वीकारले असे गिरीराज सिंह यांचे म्हणणे होते.
गिरीराज सिंह यांच्या या विधानाचा काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. गिरीराज सिंह यांनी काँग्रेसच नव्हे तर देशभरातील महिलांचा अपमान केला आहे. गिरीराज सिंह यांच्या विधानाला कोणीच गांभीर्याने घेत नाहीत. पण ते केंद्रीय राज्यमंत्रीपदावर असल्याने त्यांच्यावर मोदींनी कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी केली आहे. तर गिरीराज सिंह यांच्या विधानातून भाजपाची मानसिकता दिसून येते अशी टीका मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनी केली.
गिरीराज सिंह यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधान केले होते. मोदींना विरोध दर्शवणा-यांनी पाकिस्तानमध्ये निघून जावे असे सिंह यांनी म्हटले होते. बेजबाबदार विधान करुनही गिरीराज सिंह यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.