मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 02:01 PM2024-06-09T14:01:57+5:302024-06-09T14:02:24+5:30
मल्लिकार्जुन खर्गे यांना सरकारकडून औपचारिक निमंत्रण मिळाले आहे.
नवी दिल्ली: भारताच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी 7 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडले. दरम्यान, राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेदेखील उपस्थित राहणार आहेत. मल्लिकार्जुन खर्गेंना सरकारकडून अधिकृत निमंत्रणदेखील पाठवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते आणि मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर खर्गेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण मिळालेले नाही, तर सर्व निमंत्रणे आंतरराष्ट्रीय नेत्यांना जात असल्याचा टोलाही लगावला होता. ते पुढे म्हणतात, 2024 च्या निवडणुका नरेंद्र मोदींचा नैतिक पराभव आहे. निवडणुकीत मोदी प्रमुख चेहरा होते, पण त्यांना फक्त 240 जागा मिळाल्या. पंडित नेहरुंना 1952, 1957, 1962 मध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळाले, 370 आणि त्याहून अधिक जागा मिळाल्या. गेल्या 10 वर्षात संसदेवर बुलडोझरचा वापर करण्यात आला. पुढे बघू काय होतंय. एनडीएत विरोधाभास आहे, जेडीयूला एक गोष्ट हवीये तर टीडीपीला दुसरंच काहीतरी हवंय, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 7:15 वाजता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले, मात्र यावेळी त्यांच्या जागांची संख्या 240 आली. लोकसभेतील बहुमताचा आकडा 272 आहे. नरेंद्र मोदींना त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मित्रपक्षांची साथ लागणार आहे. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या शेजारील देशांचे नेतेही सहभागी होणार आहेत.