CoronaVirus: ...तर सरकारचे कोट्यवधी रुपये वाचतील; सोनियांच्या पंतप्रधानांना ५ सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 02:50 PM2020-04-07T14:50:50+5:302020-04-07T14:53:13+5:30
CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनियांचं पंतप्रधानांना पत्र
नवी दिल्ली: कोरोनाचं संकट अधिकाधिक गहिरं होत चालल्यानं देशाच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आहे. त्यामुळे कालच मोदी सरकारनं सर्व खासदारांसह राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी खर्चाला कात्री लावण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्या अनुषंगानं गांधींनी सरकारला काही शिफारशी केल्या आहेत.
सरकारी उपक्रमांच्या सर्व जाहिराती २ वर्षांसाठी बंद करण्याची सूचना सोनिया गांधींनी केली आहे. यामध्ये त्यांनी वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईनला देण्यात येणाऱ्या सरकारी जाहिरातींचा उल्लेख केला आहे. या जाहिराती २ वर्षांसाठी बंद केल्या गेल्यास १२५० कोटी रुपये वाचू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. यातून कोरोनाशी संबंधित जनजागृतीपर जाहिराती वगळल्या जाव्यात, असं सोनिया गांधींनी पत्रात नमूद केलं आहे.
संसदेच्या नव्या इमारतीवर होणारा २० हजार कोटी रुपयांचा खर्च टाळा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. सध्याच्या घडीला नव्या संसदेची आवश्यकता नाही. त्यामुळे या कामाला स्थगिती देण्यात यावी, असं सोनिया गांधीनी म्हटलं आहे. सरकारनं अर्थसंकल्पातील निधीत ३० टक्क्यांची कपात करावी, अशी सोनिया यांची तिसरी मागणी आहे. ही रक्कम साधारणत: २.५ लाख कोटी प्रतिवर्ष इतकी असल्याची आकडेवारी त्यांनी दिली आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द करण्याची सूचनादेखील त्यांनी केली आहे. अत्यंत गरजेच्या कारणांसाठीच परदेश दौरे केले जावेत, अशी सोनिया यांची चौथी शिफारस आहे. गेल्या वर्षी मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर ३९३ कोटी रुपये खर्च झाले होते, अशी आकडेवारी पत्रात आहे. पीएम केअर्स फंडातील रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला जावा, अशीदेखील शिफारस काँग्रेस अध्यक्षांकडून करण्यात आली आहे. यामुळे अधिक पारदर्शकता येईल. याशिवाय दोन वेगवेगळे सहाय्यता निधी सुरू ठेवण्यासाठी आवश्यक संसाधनंही वाचतील, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.